उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वेडवाकडे बोलाल, तर खैर नाही - चंद्रकांत खैरेंचा भाजपला इशारा

 उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वेडवाकडे बोलाल, तर खैर नाही - चंद्रकांत खैरेंचा भाजपला इशारा

औरंगाबाद : " उध्दव ठाकरे जंटलमन आहेत, त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा परिचय सध्या सगळ्यांनाच येतोय, कुठल्याही विषयाची सखोल माहिती घेऊनच ते निर्णय घेतात. औरंगाबादची पाणीपुरवठा योजना देखील निश्‍चितच पूर्ण होणार आहे, योजनेला कुठलीही स्थगिती दिलेली नाही. पण भाजपकडून अपप्रचार सुरू आहे, त्यांना त्याची फळ भोगावी लागतील. पण आंदोलन करतांना त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल वेडवाकडे बोलू नये, अन्यथा शिवसैनिक भडकले तर तुमची खैर नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपला इशारा दिला. 

शहरातील 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी आज महापालिका मुख्यालयसमोर जोरदार निदर्शने केली. उध्दव ठाकरे व महाआघाडीच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपने शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर सरकारनामाशी बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, मुळात पाणीपुरवठा योजनेला कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही, पण भाजपचे नगरसेवक सगळीकडे पत्रक वाटून शहरवासियांची दिशाभूल करत आहेत. पण याचे परिणाम त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भोगावे लागतील. उध्दव ठाकरे हे विचारपूवर्क आणि अभ्यास करून कुठलाही निर्णय घेतात. त्यामुळे औरंगाबादची पाणीपुरवठा योजना पुर्ण होणारच याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. 

मुळात आज शिवसेनेच्या नावाने खडे फोडून आंदोलन करणाऱ्या भाजपने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांनाच पाणीपुरवठा योजना पुर्ण का करून घेतली नाही? शेवटी योजनेसाठी पैसा लागतो, त्याचे नियोजन करावे लागते. उध्दव ठाकरे निश्‍चितच यातून मार्ग काढतील. केवळ शहरातीलच नाही, तर सातारा-देवळाई भागाला देखील आपण पाणी देणार आहोत. 

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार... 
पाणीपुरवठा योजने संदर्भात मी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तेव्हा भाजपने खोटारडेपणा करू नये असे आवाहन करतांनाच उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलतांना भाजप नगरसेवकांनी तारत्म्य बाळगावे, वेडवाकडे बोलू नये, शिवसैनिक ते कदापी सहन करणार नाही. शिवसैनिक भडकले तर मग तुमची खैर नाही असा इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला. महापौरांचा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नसल्याचेही खैरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com