संकटात धावून येणे हा शरद पवार यांचा गुणर्धमच....

संकटात धावून येणे हा शरद पवार यांचा गुणर्धमच....

औरंगाबाद : प्रत्येकाच्या संकाटात धावून जाणे हाच शरद पवार साहेबांचा गुणधर्मच आहे. याचा अनुभव माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत आणि राज्यात घेतला आहे. पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मी पहिल्यादांच आमदार झालो होता. मंत्रालयात पवार साहेब आपल्या चेंबरमध्ये बसलेले असतांना औरंगाबादेत त्यावेळी झालेल्या भीषण विमान अपघाताची माहिती त्यांना कळाली. मी या शहराचा आमदार असल्याने त्यांनी पहिला फोन मला केला, आणि बोलावून घेतले. 

विमान अपघाताची माहिती, त्यामध्ये दगावलेल्या प्रवाशांची यादी पवार साहेब न्याहाळत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे जाणवत होती. मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो तेव्हा त्यांनी, मला या घटनेची माहिती दिली आणि आपल्याला ताबडतोब औरंगाबादला निघायचे आहे, तू पण माझ्या सोबत चल असे सांगितले. मी क्षणार्धात हो म्हणालो, योगायोगाने तेव्हाचे खासदार मोरेश्‍वर सावे देखील माझ्या सोबत होते. मी पवार साहेबांना सांगितले तेव्हा ते म्हणाले त्यांना पण सोबत घे, आणि आम्ही तिघे औरंगाबादला आलो. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पवार साहेबांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि योग्य पावले तातडीने उचलण्याचे आदेश दिले. विमान अपघात खूप मोठा होता, त्यात अनेकजण दगावले होते, शहरातील व्यापारी, उद्योजकांचा त्यात समावेश होता. 

घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पवार साहेबांनी तातडीने औरंगाबादला येऊन संबंधित यंत्रणेला सूचना केल्या आणि ते परत मुंबईला निघाले. मला चंद्रकांत तू इथेच थांब, कुणाला काय मदत लागते हे बघ असे सांगितले, काही अडचण आल्यास मला कळव अशी सूचना केली. विमान अपघाताची माहिती कळल्यानंतर मुंबईहून औरंगाबादला येईपर्यंत त्यांनी अपघातात दगावलेल्या प्रत्येकाची माहिती माझ्याकडून जाणून घेतली. नैसर्गिक संकट असो, की इतर कुठले ? संकटात धावून जातांना पवार साहेबांनी कधीच पक्षाचा विचार केला नाही. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांची मैत्री असल्याने माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. ते मुख्यमंत्री आणि मी आमदार असतांना आणि त्यानंतर चारवेळा खासदार झाल्यावर दिल्लीतही पवार साहेबांचा सहवास लाभला. शहरासाठी गरजेच्या असलेल्या समांतर योजनेसाठी त्यांनी स्वतःमला पंतप्रधानांकडे नेऊन योजनेला मंजुरी मिळवून दिली होती, त्याची आठवण देखील मला कायम स्मरणात राहील. मला बाळासाहेबांनी जातीमुळे नाही तर कर्तृत्वावर संधी दिली याचा उल्लेख शरद पवार साहेबांनी वारंवार आपल्या मुलाखती आणि भाषणातून केला, माझ्यासाठी ही निश्‍चितच गौरवाची गोष्ट आहे. आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच या निमित्ताने जगदंबे चरणी प्रार्थना करतो. 

(शब्दांकन : जगदीश पानसरे ) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com