khaire danve bagade | Sarkarnama

खैरे-दानवे-बागडे एकाच व्यासपीठावर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद ः विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे तीन नेते औरंगाबादेत सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयाच्या उद्‌घाटन समारंभा निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते.

औरंगाबाद ः विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे तीन नेते औरंगाबादेत सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयाच्या उद्‌घाटन समारंभा निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते.

एरवी हे नेते अनेकदा एकत्र असतात. मात्र मुंबई महापालिकेसह राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुटलेली युती आणि शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी केलेली हातमिळवणी यामुळे या दोन पक्षातील नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खैरे-दानवे-बागडे यांना एकाच व्यासपीठावर बघून सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना हायसे वाटल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. 

भाजपला रोखण्यासाठी मराठवाड्यातच नाही तर राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेत सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षपदे पटकावली. विशेष म्हणजे जालना, औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असताना त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असलेली कटुता अधिकच वाढली आहे.

खासदार खैरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच औरंगाबादेत पासपोर्ट कार्यालय सुरु होऊ शकले असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. तर केंद्रात भाजपचे सरकार व परराष्ट्रमंत्री आहेत म्हणून पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करत आहे. त्यामुळेच शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सोबतच भाजपचे हरिभाऊ बागडे व रावसाहेब दानवे यांना देखील उद्‌घाटन समारंभास निमंत्रित करण्याचे आदेश केंद्रातूनच आले होते. त्यानुसार छावणी येथील मुख्य पोस्ट कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयाचे उद्‌घाटन या तीन नेत्यांच्या उपस्थितीत पार पडले. 
दानवेंचा खैरेंना टोला 
रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या लग्नात भाजपचे आमदार अतुल सावे यांनी चंद्रकांत खैरे यांना खुर्चीवरून उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगितले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या खैरेंनी हा आपला नाही तर शिवसेनेचा अपमान असल्याचे सांगत दानवे यांनी नियोजन व्यवस्थित केले नसल्याची तसेच माफी मागण्याची मागणी पत्रद्वारे केली होती. त्यानंतर पावणे दोन महिन्यांनी एकाच व्यासपीठावर आलेल्या दानवे यांनी खैरेंना टोला मारण्याची संधी सोडली नाही.

पासपोर्ट कार्यालय आपल्या प्रयत्नामुळे कसे आले हे खैरेंनी आपल्या भाषणातून सांगितल्यानंतर दानवे यांनी त्यांना चांगलेच शालजोडीतले टोमणे मारले. "खैरे यांच्यामुळेच पासपोर्ट कार्यालय झाले, आता दोन महिन्यात औरंगाबादेतून आंतरराष्ट्रीय विमान सुरु करा, पण दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला तर मग क्रेडिट मात्र घेऊ नका' असा टोला दानवेंनी लगावला. बागडे यांनी मात्र यावेळी संयमी भूमिका घेत शिवसेनेवर टीका करणे टाळले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख