चंद्रकांत खैरे पराभव विसरून नव्या जोमाने लागले कामाला

चंद्रकांत खैरे पराभव विसरून नव्या जोमाने लागले कामाला

औरंगाबाद : तीस-पस्तीस वर्ष राजकारणात सक्रीय असतांना आमदार, खासदार, मंत्रीपद भोगली. कधीही पराभवाचे तोंड पहावे लागले नाही, आणि अचानक लोकसभा निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला. हा धक्का पचवणे कुठल्याही राजकारण्याला जड गेले असते. पण शिवसेना नेते व औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे मात्र याला अपवाद ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरून खैरे नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. 

लोकसभा निवडणुकीच औरंगाबादमधून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या उमेदवाराकडून अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला. पक्षातूनच बंडखोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात हिंदू मतांचे विभाजन झाले आणि खैरे यांचे पाचव्यांदा खासदार आणि केंद्रात मंत्री होण्याचे स्वप्न भंगले. पण पराभवानंतर खचून न जाता शिवसेना नेता म्हणून चंद्रकांत खैरे यांनी स्वःताला संघटनेच्या कामात झोकून देत अधिक जोमाने कामाला सुरूवात केली. खैरे यांचे निवासस्थान असलेल्या डेक्कन फ्लोअर मील येथील निवासस्थानावर आजही सकाळी सात वाजेपासून खैरे यांना भेटायला येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि सामान्यांची गर्दी कायम आहे. 

धार्मिक कार्यक्रम, संत-महंताच्या भेटीगाठी, दर चतुर्थीला न चुकता राजूरच्या गणपतीची वारी, मुंबईहून शहरात येणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांची आवभगत, पक्षाच्या बैठका असा भरगच्च असा दिनक्रम खैरे यांचा असतो. 

भगवा फडकवण्यात मोलाचा वाटा.. 
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच आलेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना नेता म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांचे दौरे करत लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे मनोबल खचलेल्या कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लावले. रात्र-दिवस प्रचार, सभा, पदयात्रा आणि बैठका घेत जिल्हा ढवळून काढला. परिणामी जिल्ह्यातील आतापर्यंतच्या राजकारणात पहिल्यांदा सहाही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍यांनी विजयी झाले. शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांना या विजयाने खऱ्या अर्थाने नवा आत्मविश्‍वास मिळाला. 

राज्याच्या राजकारणातही सक्रीय... 
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. सत्ता स्थापनेच्या या संघर्षाचे शिवसेना नेते म्हणून चंद्रकांत खैरे देखील एक प्रमुख साक्षीदार ठरले. मुंबईतील पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये खैरे पक्षप्रमुखांच्या सोबतच वावरतांना दिसले. राज्याच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातून कुणाचा समावेश करायचा या संदर्भात देखील चंद्रकांत खैरे यांचे मत विचारात घेण्यात आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात आढावा बैठकी निमित्त आलेल्या उध्दव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांसोबत खैरे यांचे चांगले टयुनिंग असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना गद्दार ठरवत मातोश्रीवर पाय ठेवू देऊ नका अशी कणखर भूमिका घेत त्यांनी आपल्यातील कट्टर, एकनिष्ठ शिवसैनिकाचे दर्शन घडवले होते. 

महापालिका निवडणुकीत कस लागणार.. 
गेल्या पंचवीस वर्षापासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. पण राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर आता एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याचे मोठे आव्हान शिवसेना नेता म्हणून खैरे यांच्या समोर असणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुन्हा एकदा खैरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com