कंत्राटदाराबद्दलचे गडकरींचे विधान त्यांच्याच पक्षातील नेत्याला उद्देशून - चंद्रकांत खैरे

 कंत्राटदाराबद्दलचे गडकरींचे विधान त्यांच्याच पक्षातील नेत्याला उद्देशून - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनीधी आणि कंत्राटदारासंदर्भात केलेले विधान हे त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याला उद्देशून असल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी "सरकारनामा' शी बोलतांना केला आहे. मराठवाड्यातील या मोठ्या नेत्याबद्दल त्यांनी अनेकदा खाजगीत माझ्या बोलतांना नाराजी देखील व्यक्त केली होती. गडकरींनी त्यांच्या भाषणात या नेत्याचे थेट नावच घ्यायला हवे होते असे आवाहनही चंद्रकांत खैरे यांनी केले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी औरंगाबाद येथील औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोपात एक विधान करत खळबळ उडवून दिली होती. लोकप्रतिनिधी आणि रस्त्याची कामे करणारे कंत्राटदार यांच्यातील संबध आणि त्यातून रखडलेली कामे याचा दाखला देत गडकरींनी कठोर शब्दांत टिका केली होती. मी देशभरात लाखो कोटींची कामे केली, पण माझ्या घरी कधी एकही कंत्राटदार आला नाही, मराठवाड्यात मात्र काम सुरू होण्याआधीच कंत्राटदाराला लोकप्रतिनिधीच्या घरी जावे लागते असा घणाघात गडकरींनी केला होता. 

या संदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारले असता, खैरे म्हणाले, मी गेल्या तीस वर्षापासून राजकारणात आहे. दोनदा आमदार आणि चारवेळा सलग खासदार म्हणून निवडून आलो, परंतु माझ्या कारकीर्दीत कधी मला असा अनुभव आला नाही. मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली, कोट्यावधींचा निधी त्यावर खर्च केला, पण कधी कुण्या कंत्राटदाराला त्रास किंवा त्याच्या एका पैशाचा मी मिंधा नाही. नितीन गडकरी यांनी केलेले विधान किंवा त्यांना आलेला अनुभव हा चुकीचा नाही. मी खासदार असतांना अनेकदा मतदारसंघातील कामासाठी माझा त्यांच्याशी संपर्क यायचा. खाजगी गप्पांमध्ये त्यांनी अनेकदा मराठवाड्यातील त्यांच्याच पक्षातील एका नेत्याचे नाव घेऊन उघड नाराजी व्यक्त केली होती. औरंगाबादेत काल त्यांनी केलेले विधान हे त्याच नेत्याला उद्देशून होते असे मला वाटते. 

औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम रखडल्याबद्दल गडकरींनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. या रस्त्याचे काम रखडल्याने न्यायालयात देखील याचिका झाली होती. त्यानंतर आधीच्या कंत्राटदाराला बाजूला सारून दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्यात आले. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की गडकरी कुणावर नाराज आहेत. महाएक्‍स्पोच्या कार्यक्रमात बोलतांना गडकरी यांनी त्या नेत्याचे नाव घेऊन टीका करायला हवी होती, त्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या असेही खैरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com