Khadse Mahajan Dispute | Sarkarnama

खडसे, महाजनांच्या वादात विषय समित्या निवडीला खो

कैलास शिंदे
सोमवार, 24 एप्रिल 2017

विषय समित्यांच्या सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी खडसे आणि महाजन समर्थक सदस्यांची जोरदार स्पर्धा सुरू आहे.अद्याप त्यांची नावे निश्‍चित होवू शकली नाही. त्यामुळे हा तिढा अधिकच वाढला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्यांनीही आता दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच सदस्यांची नावे जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

जळगाव - जळगाव जिल्हा भाजपत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अतंर्गत वाद दिवसेदिवस अधिकच धुमसत आहे. त्यातूनच आता भाजपची एकहाती सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेतील विषय समितत्यांची निवडही रखडली असून हा पेच कसा सुटणार याची प्रतिक्षा आहे.

जळगाव जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली आहे, परंतु सत्तेबरोबर पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत वादही आता अधिक धुमसू लागले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपासून तर सभापती निवडीपर्यंत दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांच्या निवडीसाठी जोर लावला होता. अध्यक्ष निवडीत खडसेनी बाजी मारली तर सभापती निवडीच्या वेळी गिरीश महाजन यांनी बाजी मारत आपल्या समर्थकांची वर्णी लावली.

मात्र, आता पुन्हा विषय समित्या सदस्यांच्या निवडीचा वाद निर्माण झाला आहे.स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, बांधकाम व अर्थ समिती, शिक्षण क्रिडा आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, समाजकल्याण आणि महिला बालकल्याण समिती सभापती निवडीसाठी अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली. मात्र या सभेत समिती सदस्यांचे केवळ कोरे अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यामुळे त्या दिवशी ही निवडच होवू शकली नाही.

याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले कि, विषय समित्यांच्या सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी खडसे आणि महाजन समर्थक सदस्यांची जोरदार स्पर्धा सुरू आहे.अद्याप त्यांची नावे निश्‍चित होवू शकली नाही. त्यामुळे हा तिढा अधिकच वाढला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्यांनीही आता दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच सदस्यांची नावे जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे समित्यात कोणाच्या समर्थकांची वर्णी लागणार याकडेच लक्ष असून या निवडीनंतर आता भाजपमध्ये वाद अधिक धुमसणार की शांत राहणार याकडे आता विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचेही लक्ष आहे

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख