बंगल्याचे थकित भाडे भरण्याचे एकनाथ खडसे यांना स्मरणपत्र - Khadse given notice for non payment of rent of ministerial bunglow | Politics Marathi News - Sarkarnama

बंगल्याचे थकित भाडे भरण्याचे एकनाथ खडसे यांना स्मरणपत्र

ब्रह्मा चट्टे :सरकारनामा ब्युरो 
रविवार, 10 डिसेंबर 2017

माजी मंत्र्यांस पहिले 15 दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असते, त्यानंतर 3 महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फूट रु 50 आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यासाठी रु 100 इतका दंडनीय आकार निश्‍चित केला आहे. 

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थकबाकीची रक्कम भरण्याचे स्मरणपत्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवले आहे. 

मंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतरही बंगल्याच्या भाड्यावरून खडसेंना स्मरणपत्र आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

महसूल मंत्रीपदावर विराजमान असताना एकनाथ खडसे यांना राहण्यासाठी 'रामटेक' बंगला देण्यात आला होता. एमआयडीसीच्या भूंखडात पदाचा वापर करत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवल्याने खडसे यांना राजीनाम द्यावा लागला होता.

 राजीनामा दिल्यानंतर खडसेंचे वास्तव्य काही काळ "रामटेक" या शासकीय बंगल्यावर होते. त्यामुळे वापरापायी असलेली थकबाकी रु 15 लाख 50 हजारा रूपयांची थकबाकी अदा न केल्यामुळे त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने  स्मरणपत्र पाठविले आहे. 

सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या पत्रानुसार, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 4 जून 2016 रोजी राजीनाम्यानंतर 19 जून 2016 रोजी बंगला रिक्त करणे आवश्‍यक होते.

माजी मंत्र्यांस पहिले 15 दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असते, त्यानंतर 3 महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फूट रु 50 आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यासाठी रु 100 इतका दंडनीय आकार निश्‍चित केला आहे. 

खडसे वास्तव्य करीत असलेला 'रामटेक' बंगला आता त्यांच्या ताब्यात नाही. त्यांनी जेवढा काळ बंगला वापराला त्याच्या भाड्यापोटी ही रक्कम मागण्यात आली आहे.

19 नोव्हेंबर 2016 पर्यंत थकबाकी रु 15 लाख 49 हजार 975 आहे. बंगल्याचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेला आहे. त्यामुळे आता तात्काळ वरिल रक्कम जमा करावी, अशा आशयाचे पत्र बांधकाम विभागाने एकनाथ खडसे यांना पाठवले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख