एकनाथ खडसेंच्या आयुष्यात आता संघर्षाचे नवे वळण

 एकनाथ खडसेंच्या आयुष्यात आता संघर्षाचे नवे वळण

जळगाव : राजकीय जीवनात एखादा नेता विरोधकांशी लढा देवून पक्ष बळकटीसह गतीने विविध पदे घेत पुढे जात असतो. मात्र याच गतीला कधीकधी पक्षातूनच ब्रेक लागतो. हे केवळ भाजपच्या एकनाथराव खडसेंच्या बाबतीत झाले असे नव्हे तर कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीतही घडले आहे. परंतु ज्या नेत्यांच्या बाबतीत ते घडले त्या राजकीय नेत्यांची गती कमी झाली होती. परंतु त्यांनी संघर्षाला नवे वळण देवून आपले अस्तित्व कायम ठेवले. त्यामुळे खडसेंचीही केवळ राजकीय गती कमी झाली मात्र त्यांच्या संघर्षाचे वळण नवे असणार हेही आता निश्‍चित आहे. 

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारण्याच्या घटनेवर पक्षाने अधिकृत शिक्का मोर्तब केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून आता खडसे बाहेर पडले आहेत. त्यातील एक समाधानाची बाब म्हणजे त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यामुळे आता खडसे यांचे राजकीय जीवन संपले असे मानणे चुकीचे ठरणार आहे, हे निश्‍चित. कारण ज्या-ज्या वेळेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व स्थानिक नेतृत्वाला संपवून मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हे स्थानिक नेतृत्व संपत नाही मात्र त्यांचा संघर्षाचा रस्ता बदलतात आणि आपले अस्तित्व सिध्द करतात त्याला राजकीय भूतकाळ साक्षीदार आहे. 

कॉंग्रेस पक्ष एकेकाळी आजच्या भारतीय जनता पक्षाप्रमाणे मजबूत होता. त्यावेळीही त्या पक्षात पदासाठी स्पर्धा असायची. त्यावेळी अशाच प्रकारे पदाची इच्छा असणाऱ्यांना डावलण्यात आले होते. अगदी खानदेशचा विचार केल्यास एकेकाळी कॉंग्रेसमधून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी शिक्षणमंत्री (कै.) मधुकरराव चौधरी आणि धुळे येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील ही नेतेमंडळी एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. परंतु त्या-त्या वेळी पक्षाने त्यांना बाजूला केले आहे. प्रतिभाताई पाटील महाराष्ट्र विधिमंडळात कॉंग्रेसतर्फे विरोधी पक्षनेत्या होत्या. मात्र निवडणुकीनंतर कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा होता. मात्र त्यांना पक्षाने सोयीस्करपणे बाजूला केले, कालांतराने कॉंग्रसेचे नेते (कै.)मधुकरराव चौधरी हे सुध्दा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, परंतु कॉंग्रेसने त्यांनाही सोयीस्करपणे बाजूला केले होते. तर धुळे येथे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रोहिदासदाजी पाटील यांचा एकेकाळी कॉंग्रेसमध्ये दबादबा होता, त्यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते मात्र त्यांचेही पक्षातर्गत राजकीय बळ कमी करण्यात आले. 

भारतीय जनता पक्षाने एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत तेच केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी फक्त मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने प्रथम मंत्रिपदावरून बाजूला करण्यात आले असण्याचे सांगण्यात आले. आता उमेदवारी नाकारून पक्षातील विविध पदाच्या शर्यतीतून बाजूला करण्यात आले आहे. मात्र भूतकाळात कॉंग्रेसकडून राजकीय जीवनात बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या नेत्यांचा आभ्यास केल्यास पक्षाने या नेत्यांचे महत्व कमी केले तरी पक्षाला ते साध्य झाल्याचे दिसून आले नाही. प्रतिभाताई पाटील कालांतराने राज्यपाल आणि राष्ट्रपती झाल्या. 

मधुकरराव चौधरी विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. धुळ्याचे कॉंग्रेसचे नेते रोहिदास दाजी पाटील आजही पक्षात राजकीय अस्तित्व टिकवून आहेत, त्याचे पुत्र कुणाल पाटील आमदार आहेत. पक्षाने राजकीय बळ संपविण्याचा प्रयत्न केला तरी या नेत्यांनी संघर्षाचे मार्ग बदलले त्याला यश मिळाले. मात्र त्यांचे राजकीय अस्तित्व संपले नाही. कारण त्यांचा मूळ राजकीय पिंडच संघर्षाचा होता. एकनाथराव खडसेही याच राजकीय मुशीतले आहेत. त्यांनीही जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही भाजप बांधणी केली आहे. त्यांनी कॉंग्रेस विरूध्द संघर्ष करून भाजपसाठी जमीन तयार केली आहे. त्याच जमिनीवर आज कमळाचे पीक भरभरून आले आहे हे दिसून येत आहे. मात्र पक्षाने त्यांना निवडणुकीच्या मैदानातून बाजूला केले आहे, त्यामुळे त्यांचे राजकीय जीवन संपले असे कोणाला वाटत असेल तर ती चुक ठरणार आहे, कारण संघर्षाचा मार्ग बदलून ते आपले अस्तित्व दाखवतील हे मात्र निश्‍चित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com