आमदार तापकिरांची सांत्वन भेट; नगरसेवक दोडकेंची बैल भेट!

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच अनेक इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. खडकवासला मतदारसंघात एक बैल विजेचा धक्का लागण्याच्या निमित्ताने मेला आणि या तयारीचाप्रत्यय आला. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी या शेतकऱयाला शासकीय मदतीसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे त्यांचे विरोधक सचिन दोडके यांनी ८० हजार रूपयांचा बैल स्वतः खरेदी करून त्या शेतकऱयाला भेट दिला.
आमदार तापकिरांची सांत्वन भेट; नगरसेवक दोडकेंची बैल भेट!

पुणे : खडकवासला मतदारसंघातील शेतकऱ्याचा बैल मेल्याच्या कारणावरून संबंधित शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि त्यांचे स्पर्धक राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांच्यात स्पर्धा लागली. या दोघांच्या स्पर्धेत त्या शेतकऱ्याचे मात्र कल्याण झाले. 

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील खामगाव माळव येथील पांडुरंग लोहकरे यांचा बैल विजेच्या धक्‍क्‍याने मैल्याची घटना घडली. त्यानंतर आमदार तापकीर यांनी घटनास्थळी पावसात व चिखलात भेट देऊन मेलेल्या बैलासोबतचा "फोटो' काढला. तेवढेच नव्हे तर, शेतकऱ्याला महावितरणकडून मदत मिळवून देण्याची घोषणा त्यांनी केली. पण, ही आमदारांची निव्वळ घोषणाच असल्याचा सांगत, दोडके यांनी थेट 80 हजार रूपयांचा बैल भेट देऊन लोहकरे यांना दिलासा दिला. 

तापकीर यांनी या प्रश्‍नावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत देण्याचा आदेश दिला. सरकारी काम असल्याने ते संथ पद्धतीने होणे अपेक्षितच होते. मात्र याच काळात दोडके यांनी घाई करून मदतीचे श्रेय घेतले. गेल्या वर्षी अशाच एका अपघातात शेतकऱ्याला मदत मिळवून दिल्याचे तापकीर यांनी सांगितले. ही मदत पोचणार असल्याचे सांगत त्यांनी यात त्वरेने प्रयत्न केल्याचा दावा केला. 

मात्र मतदारसंघात या आधी अनेक शेतकऱ्यांचे बैल मेले असताना कधीच नव्या पैशाची मदत मिळाली नसल्याचा आरोप दोडके यांनी केला. याउलट दोडके यांची मदत म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप आमदार समर्थकांनी केला. 
अर्थात या साऱ्या बैल प्रकरणामागे संबंधित शेतकऱ्याच्या कळवळ्यापेक्षा या दोघांतील संभाव्य लढत असल्याचे बोलले जाते.

दोडके हे या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते देखील आमदारांवर कुरघोडीची संधी शोधत असतात. आमदारही त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असतात. एकूणच खडकवासल्यातील आगामी संघर्षाची नांदी या बैल प्रकरणात पाहायला मिळाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com