खडसे कोअर कमिटीत आहेतच...फक्त महाजनांची नव्याने एंट्री!

भाजपच्या बैठकीला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची अनुपस्थिती देखील आता चर्चेचा विषय बनू लागली आहे. ते कोर कमिटीच्या आजच्या बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांच्या गच्छंतीची अफवा पसरली. मात्र त्यांचे स्थान कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
खडसे कोअर कमिटीत आहेतच...फक्त महाजनांची नव्याने एंट्री!

जळगाव : भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंसह आता खानदेशातून जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचेही नाव समाविष्ट झाले आहे. आपल्याला या कमिटीतून काढल्याची अफवा असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

कोअर कमिटीच्या आज झालेल्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाही, असे कळविले होते. मात्र, त्यामुळे कमिटीतून आपल्याला वगळल्याची अफवा पसरविण्यात आली. आपण कोअर कमिटीसह राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम आहोत, असे खडसेंनी सांगितले.
 
भारतीय जनता पक्षाची राज्याची कोअर कमिटी पक्षाच्या विविध निर्णय प्रक्रियेच्या संदर्भात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या कमिटीतील सदस्यांच्या मताला विशेष महत्त्व असते. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचे निकटचे सहकारी म्हणजे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना आता या कोअर कमिटीत स्थान मिळाले आहे.

गतकाळात झालेल्या नाशिक महापालिका निवडणूक, पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक, जळगाव व धुळे महापालिकांच्या निवडणुकीत महाजनांच्या नेतृत्वाखाली भाजपने यश मिळविले. तसेच राज्यातील विविध प्रश्‍नांबाबतही महाजनांची मध्यस्थी यशस्वी ठरली होती. त्यामुळे सरकारचे "संकटमोचक' म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली असून त्या बळावर आता त्यांना पक्षाच्या कोअर कमिटीतही घेण्यात आले आहे. 

असे आहेत कोअर कमिटीचे सदस्य 

भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आता गिरीश महाजनांचाही समावेश झाला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कोअर कमिटीत स्थान मिळाले, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या समितीत समावेश झाल्याने जबाबदारी वाढली आहे, असे महाजन यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com