भाजप सोडल्यास एकनाथ खडसे नक्की कुठला पर्याय स्वीकारतील ?

भाजप सोडल्यास एकनाथ खडसे नक्की कुठला पर्याय स्वीकारतील ?

जळगाव : भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल..असा निर्वाणीचा ईशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी वेगळा विचार केलाच तर पर्याय म्हणून ते "शिवसेना' कॉंग्रेस कि "राष्ट्रवादी' निवडतील याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहे. भाजप विरोधी चेहरा, अभ्यासू वक्तृत्व, आक्रमक नेतृत्वाचा फायदा ते ज्या पक्षात जातील त्याला होणार आहे. 

एकनाथराव खडसे यांनी पक्षांतर करणार नाही आजपर्यंत ठामपणे सांगितले आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोअर कमेटीची बैठक झाल्यानंतर मात्र त्यांनी "पक्ष आपल्यावर वारंवार अन्याय करीत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल'असा इशाराच दिला आहे. त्यांनी पक्षाला प्रथमच असा इशारा दिला आहे. 

खडसे यांनी पक्षाला इशारा दिला असला तरी पक्षातील नेत्यांकडून त्याबाबत फारसा विचार केला जाईल असे वाटत नाही. राज्यात पक्षाची सत्ता असतांना गैरव्यवहराच्या आरोपावरून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्यापर्यत नेतृत्वाने त्यांना व्यवस्थित बाजूला केले. त्यामुळे खडसे यांनी स्वत:हूनच पक्षातून जावे असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत असावे असेही संकेत आहेत. त्यामुळे नेते त्यांना पक्षातरापासून रोखण्याचे प्रयत्न करतील असे वाटत नाही. 

पंकजा मुंडे यांनी केवळ एक ट्‌विट केले, तर पक्षाचे नेते खडबडून जागे झाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेवून त्या कुठेही जाणार नाहीत असे जाहीर करावे लागले. परंतु खडसे यांच्या इशाऱ्यानंतही पक्षाचे नेते फारसे गांभीर्य घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे खडसे वेगळा विचार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे दिसत आहे. एकनाथराव खडसे यांनी वेगळा विचार केल्यास त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी, किंवा कॉंग्रेस असा पर्याय आहे. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे त्याचा पर्याय होवू शकतो. भाजपचे माजी खासदार व विद्यमान विधानसभा सभापती नाना पटोले यांनी भाजप सोडल्यानंतर कॉंग्रेसचा मार्ग पत्करला, पक्षानेही त्यांना लोकसभेत पराभूत झाल्यानंतर विधानसभेत उमेदवारी दिली. ते निवडूनही आले. भाजपचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना विधानसभेचे सभापतीपदही देण्यात आले. त्यामुळे नानांप्रमाणे भाजपचा कट्टर विरोधक म्हणून कॉंग्रेसला त्यांचा फायदा होवू शकतो. 

खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असे सांगत असतांनाच शेवटी "जय महाराष्ट्र'म्हटले त्यामुळे ते शिवसेनेचा पर्याय स्वीकारतील असे वाटत आहे. खडसे आक्रमक आहेत, शिवसेनेची आक्रमकता हाच मुळ आत्मा आहे. राज्यात भाजपला टक्कर देवून किंबहुना विरोधी नेत्यांना थेट अंगावर घेवून त्यांना मुद्येसुद उत्तरे देण्यात खडसे वाकबगार आहेत. विरोधी पक्ष नेते असतांना त्याही ही चुणूक अनेक वेळा दाखविली आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पक्ष वाढीसाठी शिवसेनेला त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याबाबत शिवसेना आणि स्वत: तेही सकारात्मक असण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्याय खडसे यांना निवडणुकीतच होता, असे सांगण्यात येत आहे. त्यांना पक्षातर्फे उमेदवारीचा एबी फार्मही पाठविण्यात आला होता. मात्र त्यावेळी खडसे यांनी फारशी उत्सुकता दाखविली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरीही खडसे यांचे पक्षबांधणीचे कौशल्य, आक्रमकपणा आणि त्यांना मानणारे कार्यकर्ते याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जळगाव जिल्हयासह राज्यातही होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्वही त्याबाबत सकारात्मक असेल. 

विशेष म्हणजे राज्यात विधानपरिषदेच्या बारा जागा रिक्त आहेत. त्यात सत्तेतील तिनही पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या पाहता. विधानपरिषदेच्या बारा जागात या पक्षांचा अधिक वाटा असणार आहे. त्यामुळे त्यांनी तीन पक्षापैकी कोणताही पर्याय स्वीकारल्यास त्यांना विधानपरिषदेसह मंत्रीपदाचीही संधी मिळू शकते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com