Kenj BJP Mla Sangeeta Thombare Diwali Celebrations | Sarkarnama

मतदार संघाचा दौरा, फराळ अन् मुलांसोबत दिवाळीचा आनंद घ्यायची संगिता ठोंबरेंची लगबग

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

आमदार संगीता ठोंबरे यांची पुण्याला शिकायला असलेली अथर्व आणि श्रावणी ही दोन्ही मुले केजला आली आहेत. मुलांसह कुटुंबियांसोबत त्यांनी दिवाळीची तयारी आणि सण साजरा करायला सुरुवात केली आहे. वसुबारस, धनत्रयोदशी आणि नरकचतुर्दशीचे कार्यक्रम त्यांच्या घरी पारंपारिक पद्धतीने साजरे झाले. 

बीड : उच्चशिक्षीत आमदार असलेल्या संगीता ठोंबरे उत्तम गृहिणीही आहेत. आमदार म्हणून मतदार संघातील कामे आणि दौरे करण्याबरोबरच मुले श्रावणी आणि अथर्व यांच्यासह कुटुंबियांसोबत त्या दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळीचा फराळ तयार करण्यापासून वसूबारस, धनत्रयोदशी आणि नरकचतुर्थी या तीन दिवसांचे विविध कार्यक्रम त्यांनी घरीच साजरे केले. 

हल्लीचा जमाना म्हणजे सासू - सासऱ्यांपासून दूर कधी जाऊ अशाच सुनांचा आहे. मात्र, सासू- - सासऱ्यांसह सासूंबाईंच्या (पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्या आजी) आईलाही संगीता ठोंबरे यांनी स्वत:च्या आजीप्रमाणे जीव जाऊन सांभाळले. विशेष म्हणजे त्यावेळी संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे दोघेही नोकरी करत होते. दरम्यान, ठोंबरे कुटुंबियांत सर्वच सण - उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरे होतात. त्यात संगीता ठोंबरे अग्रभागी असतात. विशेष म्हणजे आमदारकीच्या या चार वर्षातही यात कधी बदल झाला नाही. 

दिवाळी हा सर्वांचाच आनंदाचा सण आहे. यात साहित्याची जुळवाजुळव आणि फराळ तयार करण्याची जबाबदारी महिलांची. आता निवडणुकीचे वर्ष असल्याने मतदार संघातील गाठी - भेटी, विकासाचे प्रश्न आणि कामांची उद्घाटने अशी लगबग आहे. तरीही संगीता ठोंबरे या वेळेचे व्यवस्थापन करुन आमदार आणि गृहिणीची भुमिका चोखपणे पार पाडत आहेत. पुण्याला शिकायला असलेली श्रावणी आणि अथर्व ही त्यांची दोन्ही मुले सुट्या लागताच केजला आली आहेत. 

तसे मुंबईला जाताना संगीता ठोंबरे अधून - मधून मुलांना भेटत असतात. मात्र, आता सर्वजण सोबत दिवाळीचा सण साजरा करताना होत असलेला आनंद कैक पटीने आहे. दरम्यान, मुलांसह कुटुंबियांना आणि पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी लागणारे फराळाचे बहुतेक पदार्थ त्यांनी स्वत: बनविले आहे. करंज्या, चकल्या, बेसन लाडू, बुंदीचे लाडू, चिवडा असे अनेक पदार्थ त्यांनी बनविले असून रोज दोन पदार्थांची भर पडत आहे. पीठ मळण्यापासून ते लाडूला साखरेची चाचणी आणि हाती झाऱ्या घेऊन तळण करताना त्यांच्यातील गृहीणीचा उत्साह पाहण्याजोगा आहे. 

रोज सकाळी उठून स्वत: अभ्यंगस्नान केल्यानंतर मुलांना तयार करुन त्यांच्यासोबत फटाके फोडण्याचा आनंदही त्या घेत आहेत. भल्या सकाळी आणि सायंकाळी दारात सुंदर रांगोळी काढून त्यात रंग भरताना मुलगी श्रावणीलाही रांगोळी काढण्याचे धडे त्या देत आहेत. दिवाळी म्हणजे प्रकाश आणि पणत्यांचा सण. त्यामुळे रोज सायंकाळी स्वत:च त्या दारात आणि घरावर पणत्याही पेटवितात. 

सरकारनामा दिवाळी अंक अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात घरपोच मिळवा - येथे क्लिक करा अंकाची मागणी नोंदवण्यासाठी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख