kejriwal govt on war front as 93 corona patients found at markaz in Delhi | Sarkarnama

निजामुद्दीन एरियात 93 कोरोनारुग्ण आढळले : केजरीवाल सरकारचे धाबे दणाणले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 एप्रिल 2020

दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यानुसार दिल्लीतील रुग्णालयांमध्ये तबलिगी जमातच्या 671 जणांना दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जणांना विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत तबलिगी जमातचे मुख्यालय असलेल्या मशिदीतील समुहामध्ये कोरोनाचे 93 रुग्ण आढळल्याने संक्रमणाचा धोका वाढला असून सरकारचे धाबे दणाणले आहे. संपूर्ण निजामुद्दीन परिसर कोरोना हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतून इतरत्र विखुरलेल्या तबलिगी कार्यकर्त्यांच्या शोधासाठी देशभरात मोहिम राबविली जात आहे.

संपूर्ण देशात संचारबंदी सुरू असताना निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमातच्या मर्कजमध्ये (मुख्यालयामध्ये ) हजारोंच्या संख्येने लोक धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यात या समूहामध्ये उत्तर प्रदेश,पंजाब, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्रासह देशभरातून लोक आले होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया, इंग्लंड, चीन येथील नागरीकांचाही समावेश होता. या समुहामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळल्याने संक्रमणाचा फैलाव अन्य भागात होण्याच्या भीतीने सरकारची तारांबळ उडाली आहे. उपाययोजनांसाठी आता सरकारची धावपळ सुरू झाली असली तरी ऐन संचारबंदीच्या काळात एवढ्या संख्येने जमावाचे असणे आणि सरकारला त्याची खबरबात नसणे यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

सुरवातीला या मशिद वजा मुख्यालयात हजार जण असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात त्यातून तब्बल 2361 जणांना बाहेर काढण्यात आले. मुख्यालय रिकामे करण्याची पोलिसांनी चेतावणी देऊनही तबलिगी जमातने नकार होता. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी जाऊन समजावल्याचे कळते. त्यानंतर मुख्यालय रिक्त करण्याची कारवाई सुरू झाली.

तब्बल 36 तास चालेली ही कारवाई आज पहाटे चारपर्यंत सुरू होती. त्यानंतर या मुख्यालयात औषधांची फवारणी करण्यात आली. येथून बाहेर काढलेल्या सर्वांची नावे, पत्ते पोलिसांकडे देण्यात आली आहेत. दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यानुसार दिल्लीतील रुग्णालयांमध्ये तबलिगी जमातच्या 671 जणांना दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जणांना विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून संचारबंदीचे कठोरपणे पालन सुरू झाले आहे.

दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या राज्यांमधून दिल्लीत आलेले तबलिगी जमातचे कार्यकर्ते आपापल्या भागांमध्ये परतले असल्याने तेथेही कोरोना संक्रमणाची वाढती शक्यता पाहता या सर्वांना शोधण्यासाठी सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यसचिव तसेच पोलिस महासंचालकांची व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तसेच तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे संक्रमणाचा वाढलेला धोका आणि त्यावरील उपाययोजनांची चर्चा केली. राज्यांनी तेथे पोहोचलेल्या तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांना शोधून त्यांचे विलगीकरण करावे, असे सांगण्यात आले. कोरोनाचा उपद्रव वाढल्यानंतर सरकारने गेल्या काही आठवड्यांपासून सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले असताना या कार्यक्रमामध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग आढळल्यामुळे व्हिसाच्या नियम, अटींचे उल्लंघन झाले आहे काय याची तपासणी सरकारने सुरू केली आहे. संबंधित राज्यांनीही याप्रकरणात कारवाई करावी, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर आयोजकांवर कारवाईचे आदेशही राज्यांना दिले. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही आज बैठक झाली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख