इंदिरा गांधी, मोदी यांच्यानंतर आता केजरीवाल म्हणतात, माझ्याविरूध्द ते सारे !

मोदींना तर विषय नोटबंदीचा असो की सीएए कायदा, सारे विरोधक फक्त आपल्याच विरूध्द असल्याचे संसद म्हणजेच लोकसभेपासून भाजप मुख्यालयातील सभेपर्यंत कायमच वाटत असते. मोदीनी 2014 मध्ये भ्रष्टाचार मुक्तीबरोबरच अच्छे दिन आऐंगे व सबका साथ सबका विश्‍वास हा नारा दिला होता. 2019 मध्ये त्यांनी पहिल्या दोन्हींना तिलांजली देत भ्रष्टाचार को मिटाना है, हे वाक्‍य वारंवार उच्चारले व पूर्वीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या.
इंदिरा गांधी, मोदी यांच्यानंतर आता केजरीवाल म्हणतात, माझ्याविरूध्द ते सारे !

नवी दिल्ली : " माझा उद्देश आहे, भ्रष्टाचाराला हरविणे व दिल्लीला विकासात अग्रेसर करणे व " त्यांचा ' सर्वांचा एकच उद्देश आहे की मला हरविणे'.... हे वाक्‍य वाचून जुन्या काळातील लोकांना दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सत्तरच्या दशकातील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 पासून अनेकदा केलेल्या वक्तव्यांची आठवण येईल...पण ताजे वक्तव्य या दोघांचे नसून ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आहे. 

गोंधळलेला भाजप व गलितगात्र कॉंग्रेस यांच्यासमोर दिल्लीच्या निवडणुकीत अत्यंत मजबूत स्थितीत असलेल्या केजरीवालांना "मी विरूध्द ते' अशी सांगड घालण्याची वेळ का यावी, याबाबत राजकीय जाणकारांना बुचकळ्यात टाकणारे ठरले आहे. केजरीवाल आज अर्ज भरण्यासाठी जात असताना 35 जणांच्या टोळक्‍याने गोंधळ करत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास आडकाठी केली व धक्काबुक्कीही केली असा आपचा आरोप आहे. या भागातील महापालिकेत भाजपचा जोर आहे. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की "" एका बाजूला भाजप, एलजेपी, जेजेपी, कॉंग्रेस, आरजेडी. दुसऱ्या बाजूला शाळा, रूग्णालये, पाणी, वीज, महिलांना मोफत बसप्रवास, दिल्लीची जनता. माझा उद्देश भ्रष्टाचाराला हटवून दिल्लीला पुढे नेणे तर त्या सर्वांचा उद्देश मला हरविणे' 

केजरीवाल यांचा व आम आदमी पक्षाचा उदयच भ्रष्टाचाराविरूध्दच्या आंदोलनातून झाला. पाच वर्षे व दोनदा मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्यांवेळी विधानसभेतील 70 पैकी 67 जागा जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या केजरीवाल यांनी यंदा तिकीट वाटपापासून दिल्लीकरांना जिव्हाळ्याच्या गोष्टींवर सूट किंवा सवलती देण्याचा सपाटा लावून आधीच फार मोठी आघाडी घेतल्याचे मानले जाते. लाईट-पाणी-आरोग्यसेवा, महिलांना बसप्रवास फुकटात किंवा अत्यल्प पैशात मिळणाऱ्या दिल्लीकरांच्या रिक्षा, मेट्रो किंवा डीटीसी बसमधील चर्चाही केजरीवालांच्याच बाजूने अगदी एकतर्फी जात आहेत. 

सारी अनुकूलता दिसत असूनही केजरीवाल यांनी ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळीच ट्विट करून भ्रष्टाचारावीरूध्द लढाई व साऱ्या विरोधकांना आपल्यालाच हटवायचे आहे अशी इंदिरा-मोदीमय भाषा करण्यामागे त्यांचे राजकारण आहे की "आपल्या बाजूच्या हवेतही' जाणवणाऱ्या असुरक्षेत, हा चर्चेचा विषय ठरला आहे. इंदिरा यांनी 1971 मध्ये लोकसभा सोडताना, "ते म्हणतात इंदिरा हटाव व मी म्हणते गरीबी-भ्रष्टाचार हटाव' असे चमकदार वाक्‍य फेकले व नंतर 283 वरून 352 जागा जिंकून एक हाती निवडणूक जिंकली. 

मोदींना तर विषय नोटबंदीचा असो की सीएए कायदा, सारे विरोधक फक्त आपल्याच विरूध्द असल्याचे संसद म्हणजेच लोकसभेपासून भाजप मुख्यालयातील सभेपर्यंत कायमच वाटत असते. मोदीनी 2014 मध्ये भ्रष्टाचार मुक्तीबरोबरच अच्छे दिन आऐंगे व सबका साथ सबका विश्‍वास हा नारा दिला होता. 2019 मध्ये त्यांनी पहिल्या दोन्हींना तिलांजली देत भ्रष्टाचार को मिटाना है, हे वाक्‍य वारंवार उच्चारले व पूर्वीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. केजरीवाल यांच्या ट्विटमुळे अनेकांच्या मनात इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी, ऑपरेशन ब्ल्यू स्टार व मोदीयुगातील अदृश्‍य भयाचे वातावरण, यांचीच आठवण जागी झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com