Keep Schools Away from Politics Warns Varsha Gaikwad | Sarkarnama

शाळांना राजकारणापासून दूर ठेवा - वर्षा गायकवाड यांची ताकीद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सीएएच्या समर्थनार्थ माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालयाने विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड लिहून घेण्याचे प्रकरण राज्य सरकारने गंभीरपणे घेतले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्‍त केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

मुंबई : शाळांना राजकारणापासून दूर ठेवा अशी सक्‍त ताकीद शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा व्यवस्थापनांना दिली आहे. विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी करणे हे गंभीर असल्याचे मत गायकवाड यांनी व्यक्‍त केले आहे.

सीएएच्या समर्थनार्थ माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालयाने विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड लिहून घेण्याचे प्रकरण राज्य सरकारने गंभीरपणे घेतले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्‍त केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुलुंड येथील संबंधित शाळेच्या प्रकरणाशी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असे वर्षा गायकवाड यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. शाळेच्या विश्‍वस्तांनी या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले आहे, मात्र या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्‍यकता त्यांनी व्यक्‍त केली. तसेच शाळा आणि विद्यार्थी हे राजकारणापासून दूर ठेवा अशी सक्‍त ताकीद गायकवाड यांनी दिली आहे.

माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालय या दोन शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण उपनिरिक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच राज्यातील सव शाळांनाही विद्यार्थ्यांचा राजकीय विचार पसरविण्यासाठी वापर होता कामा नये असे आदेश देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित शाळांनी सीएएबाबत विद्यार्थ्यांकडून पोस्टर तयार करून घेतले तसेच त्याबाबतच्या घोषणाही विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख