shekhar gore
shekhar gore

माणमध्ये शेखर गोरे गटाचा सभापती

आम्ही कोणालाही पाठींबा मागितला नव्हता. आमच्या तानाजी कट्टे यांना उपसभापती पदासाठी ज्यांनी पाठिंबा दिला, तो त्यांनी का दिला माहिती नाही. आमचे तीन सदस्य सभापती व उपसभापती निवडीत एकत्र राहिले. राष्ट्रवादीने पाच सदस्यांना व्हिप बजावला होता. ज्यांनी व्हिप पाळला नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

दहिवडी (जि. सातारा) : माण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत नवीन राजकीय समीकरणे आकारास आली. त्यामुळे शिवसेनेचे शेखर गोरे गटाच्या आंधळी गणातील सदस्या कविता जगदाळे यांची सभापतीपदी तर गोंदवले बुद्रुक गणाचे राष्ट्रवादीचे सदस्य तानाजी कट्टे यांची उपसभापती पदी निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम झाला. सभागृहात शिवसेनेच्या शेखर गोरे गटाचे विजयकुमार मगर, नितीन राजगे, कविता जगदाळे व अनिल देसाई गटाचे तानाजी काटकर हे सदस्य एकत्र आल्याने या दोन्ही गटात आघाडी झाली. भाजपचे आमदार जयकुमार गोरे गटाचे तीन सदस्य व प्रभाकर देशमुख गटाचे तीन सदस्य वेगवेगळे उपस्थित राहिले.  

बारा वाजून एक मिनिटांनी मतदान सुरु झाले. मतदान प्रक्रियेवेळी ऐनवेळी मोठा बदल दिसून आला. सुरुवातीला उपसभापती पदासाठी हात वर करुन मतदान झाले. आमदार गोरे गटाच्या चंद्राबाई आटपाडकर यांच्यासाठी स्वतः त्यांच्यासह कोणीच हात वर केला नाही. मात्र  प्रभाकर देशमुख गटाच्या तानाजी कट्टे यांना रमेश पाटोळे, लतिका विरकर यांच्यासह आमदार गटाच्या रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर अशी एकुण सहा मते मिळाली. अनिल देसाई गटाचे तानाजी काटकर यांना शेखर गोरे गटाच्या विजयकुमार मगर, नितीन राजगे, कविता जगदाळे अशी चार मते मिळाली. त्यामुळे मतदानापूर्वी तानाजी काटकर हे निवडून येतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच ऐनवेळी आमदार गोरे गटाचा पाठींबा मिळालेले तानाजी कट्टे हे सहा मतांनी उपसभापतीपदी निवडून आले. अनपेक्षितपणे राष्ट्रवादीला उपसभापती पदाची लॉटरी लागली.

सभापती पदासाठी झालेल्या मतदानात सर्व गणिते बदलली. शेखर गोरे गटाच्या कविता जगदाळे यांना स्वत:सह विजयकुमार मगर, नितीन राजगे व अनिल देसाई गटाचे तानाजी काटकर अशी चार मते मिळाली. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे गटाच्या रंजना जगदाळे यांना स्वत: सह अपर्णा भोसले व चंद्रबाई आटपाडकर अशी फक्त तीनच मते मिळाली. त्यांना प्रभाकर देशमुख गटाने साथ दिली नाही. प्रभाकर देशमुख गटाच्या लतिका विरकर यांना त्यांच्या स्वतःसह रमेश पाटोळे व तानाजी कट्टे अशी तीन मते मिळाली. त्यामुळे चार मते मिळालेल्या शेखर गोरे गटाच्या कविता जगदाळे यांची सभापती पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाहीर केले.

आज झालेल्या निवडीत सभापती कविता जगदाळे व उपसभापती तानाजी कट्टे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत. कविता जगदाळे यांनी राष्ट्रवादी सोडली नसली तरी सध्या त्या शिवसेनेच्या शेखर गोरे यांच्या गटात आहेत. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com