katol bypoll issue | Sarkarnama

काटोल विधानसभा निवडणूक केव्हा? 

विरेंद्रकुमार जोगी
सोमवार, 14 जानेवारी 2019

काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही विधानसभा पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने विकास रखडला आहे. आता ही पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नागपूर : काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही विधानसभा पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने विकास रखडला आहे. आता ही पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी गेल्या 2 ऑक्‍टोबरला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा राजीनामा गेल्या 6 ऑक्‍टोबरला विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. या राजीनाम्याला आता 3 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. 

एखाद्या आमदाराने राजीनामा दिल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक करून नवा लोकप्रतिनिधीची निवड करण्याची प्रथा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या मतदारसंघात आमदार नसल्याने विकास कामांवर बराच परिणाम झाला आहे. विधानसभेत किंवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या मतदारसंघाचा कुणी वालीच राहिला नाही. दुष्काळाची स्थिती तालुक्‍यात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न बिकट असताना या मतदारसंघाला आमदारच नसल्याने या मतदारसंघाच्या समस्या सरकार दरबारी मांडल्या जात नाही. 

निवडणूक होण्याची कोणतीही चिन्हे नसली तरी भाजपमध्ये मात्र संभाव्य उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. ते सभापती असून ग्रामीण भागातील समस्यांची चांगली जाण आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरोदे यांनी विविध उपक्रम लावल्याने त्यांची प्रतिमा चांगली झाली आहे. 

नागपुरातील भाजपचे नेते अविनाश ठाकरे यांनाही काटोलचे आमदारपद खुणावू लागले आहे. कोणत्याही विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी ते ठिकठिकाणी "पोस्टर' लावत असल्याने मतदारसंघात त्यांचा "पोस्टर बॉय' म्हणून उल्लेख केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला काटोलमध्ये पाठविल्याचा दावा ठाकरे करीत आहेत. 

काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी दावेदारी केली आहे. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्‍वासातील मानले जातात. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. यामुळे ठाकूर यांनाही आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असे वाटत आहे. 

भाजपात इच्छुकांची संख्या वाढत असली तरी नजिकच्या काळात निवडणूक होण्याची कोणतीही शक्‍यता नाही. या संदर्भात `सरकारनामा'शी बोलताना माजी आमदार आशीष देशमुख म्हणाले, की काही राज्यांमध्ये जानेवारी महिन्यात पोटनिवडणुका होत आहेत. यासोबत काटोलची पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला काहीच हरकत नव्हती. परंतु भाजपच्या नेत्यांना पराभवाची भीती असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख