"काटोलमधून देशमुखच निवडून येणार ?

in katol again deshmukha said ashish deshmukha
in katol again deshmukha said ashish deshmukha

नागपूर : काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी मध्येच भाजपला रामराम ठोकल्याने आता माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोण लढणार? याचीच सर्वाधिक चर्चा काटोल मतदारसंघात आहे. मागील निवडणुकीत माजी मंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे भाजपला आता येथे विजय सोपा वाटत आहे.

अनेक दावेदार तयार झाले आहेत. यात प्रामुख्याने चरणसिंग ठाकूर, अविनाश ठाकरे, संदीप सरोदे, राजू हरणे, उकेश चौहान व मनोज खळतकर यांचा समावेश आहे. अनिल देशमुखांना हरवून आमदार झालेल्या डॉ. आशीष देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे काकासोबत पुन्हा सलोख्याचे संबंध निर्माण झाले. काटोलमधून देशमुखच निवडून येणार, ही आशीष देशमुख यांची भविष्यवाणी किती खरी ठरते, हे येणारा काळच सांगेल. 

अनिल देशमुख यांनी सलग चारवेळा काटोल मतदारसंघ जिंकला होता. त्यांचा पराभव करणे अशक्‍य असल्याचे बोलले जात होते. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. सेनेने येथे अनेक प्रयोग केले; मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी भाजपने त्यांचाच पुतण्या डॉ. आशीष देशमुख यांना लढण्यास तयार केले आणि ते जिंकलेसुद्धा. मात्र, महत्त्वाकांक्षी असलेल्या डॉ. देशमुखांचे भाजपच्या नेत्यांशी फारसे पटले नाही.

त्यांना स्वतंत्र विदर्भ हवा होता. वारंवार मागणी करून ते मुख्यमंत्र्यांसह पक्षालाच अडचणीत आणत होते. शेवटी कंटाळून देशमुख यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. काटोल आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. काकाच राष्ट्रवादीकडून प्रथम दावेदार असल्याने ते दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घेत आहेत.

दरम्यान, आशीष यांच्या राजीनाम्यामुळे अनिल देशमुख यांचा उत्साह वाढला आहे. भाजपवर संधी मिळेल तेव्हा तोंडसुख घेण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. भाजपने मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्या वाड्यावर परिसरातील नागरिकांची व कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. पराभूत झाल्यानंतरही त्यांच्याकडे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आली आहे. याचा फायदा त्यांना होण्याची पूर्ण शक्‍यता आहे. 

जिंकलेला मतदारसंघ भाजपला शिवसेनेसाठी सोडायचा नाही. आजवरच्या राजकीय घडामोडींवरून ते दिसून येते. शिवसेनेकडेसुद्धा अनिल देशमुख यांना पराभूत करू शकेल इतका दमदार नेता सध्या तरी नाही. भाजपचीही हीच अडचण आहे. मात्र, भाजपचे नेटवर्क येथे चांगले आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपला याचा फायदा होऊ शकतो. पाच वर्षांत भाजपने काहीच केले नाही, असा आरोप अनिल देशमुख सातत्याने करीत असतात. मात्र, तत्पूर्वी 15 वर्षे आघाडीची सत्ता होती आणि ते स्वतः मंत्रिमंडळात होते, याचा त्यांना विसर पडल्याचा आरोप त्यांच्यावरही होतो.

यापूर्वी शंकरराव गेडाम, डॉ. श्रीकांत जिचकार, सुनील शिंदे आदी दिग्गजांनी काटोलचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनिल देशमुख यांचा राजकारणात प्रवेश झाला. येथून ते थेट राज्याच्या मंत्रिमंडळात दाखल झाले.

देशमुखांच्या गाडीवर 20 वर्षे लाल दिवा चमकत होता. मात्र, देशमुखांना पुतण्या आशीष देशमुखांनीच मात दिली. राजीनामा दिल्यानंतर त्यांचे काकासोबत पुन्हा सलोख्याचे संबंध निर्माण झाले. काटोलमधून देशमुखच निवडून येणार, ही डॉ. आशीष देशमुख यांची भविष्यवाणी किती खरी ठरते, हे येणारा काळच सांगेल. 

शिवसेनेचा दावा कायम 
काटोलमध्ये मध्यंतरी विस्तारक म्हणून अविनाश ठाकरे यांची नेमणूक केली होती. त्यांचा राजकीय कार्यक्रमांमधील सक्रिय सहभाग लक्षात घेता त्यांचेही नाव समोर आले होते. पोटनिवडणुकीच्या घडामोडी सुरू असताना त्यांनी लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

आता त्यांना येथून बाजूला करून ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष केले आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना काटोलच्या सभेला बोलावून घेतले असल्याने ठाकरे यांच्या नावाची चर्चा अद्याप कायम आहे. मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध आहे.

युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या काटोल मतदारसंघावर सेनेने दावा कायम ठेवला आहे. काटोलच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले चित्रपटनिर्माते मनोज खळतकर व डॉ. नीतेश हेलोंडे हेदेखील शिवसेनेकडून रांगेत आहेत. 

आकडेवारी 2014 विधानसभा 
- डॉ. आशीष देशमुख (भाजप) 70, 344 
- अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 64,787 
- राजेंद्र हरणे (शिवसेना) 13, 649 
- राहुल देशमुख (शेकाप) 9,589 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com