karunanidhi-sensitive-writer-journalist | Sarkarnama

#Karunanidhi कलाकार, लेखक, पत्रकार करुणानिधी : संवेदनशील, सामाजिक विषयांची हाताळणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुथ्थूवेल आणि अंजूगम यांच्या पोटी 3 जून 1924 रोजी करुणानिधींचा थिरुकुवलाई (नागपट्टणम) येथे जन्म झाला. करुणानिधींनी तमीळ चित्रपटातून आपले करियर सुरू केले. सामाजिक सुधारणा आणि ऐतिहासिक लेखनाबद्दल ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले.

पुणे : मुथ्थूवेल आणि अंजूगम यांच्या पोटी 3 जून 1924 रोजी करुणानिधींचा थिरुकुवलाई (नागपट्टणम) येथे जन्म झाला. करुणानिधींनी तमीळ चित्रपटातून आपले करियर सुरू केले. सामाजिक सुधारणा आणि ऐतिहासिक लेखनाबद्दल ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. प्रागतिक विचाराच्या करुणानिधींनी चित्रपटाच्या माध्यमातून आपले विचार सामान्यांपर्यंत पोचवणे सुरू केले. त्यांचा `पराशक्ती' हा चित्रपट वादग्रस्त ठरला, त्याने द्रविड चळवळीचा विचार लोकांपर्यंत नेला. यानिमित्ताने शिवाजी गणेशन आणि एस. एस. राजेंद्रन हे दोन अभिनेते तमीळ चित्रपटसृष्टीला मिळाले. त्यांच्या `पानाम' आणि `थंगरथनम' या चित्रपटांतून विधवा पुनर्विवाह, स्वयंसन्मान, अस्पृश्‍यता आणि जमीनदारी संपवणे, धार्मिक वर्चस्ववादाला आव्हान असे विषय हाताळले गेले. सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांच्या दोन नाटकांवर पन्नासच्या दशकात बंदीही घातली गेली होती. 

विपुल लेखन 
साहित्यक्षेत्रातील बहुविध प्रकार हाताळणाऱ्या करुणानिधींनी थिरूकुरल यांच्या कुरलोवियमची संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली. थोलक्काप्पिया पुंगा, पुंबूकर यांचे लेखन त्यांनी केले. तमीळ कला आणि शिल्पशास्त्र यांच्याबाबतही त्यांनी योगदान दिले. कन्याकुमारी येथे करुणानिधींनी थिरुवल्लूवर यांचा 133 फूट उंचीचा पुतळा उभारून थोर तमीळ विद्वानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

पत्रकार, व्यंगचित्रकार 
वयाच्या विसाव्या वर्षी करुणानिधी यांनी ज्युपिटर पिक्‍चर्ससाठी पटकथा लेखन केले. त्यांच्या "राजाकुमारी' चित्रपटाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी शालेयवयात सुरू केलेले "मुरसोली' सुरवातीला मासिक, नंतर साप्ताहिक आणि आता दैनिक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे. आपल्यातील पत्रकार आणि व्यंगचित्रकार सतत जागा ठेवत ते ज्वलंत विषयांवर आपल्या पक्षाची तात्त्विक भूमिका जनतेसमोर ठेवत. गेली 50 वर्षे नियमितपणे ते पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शक असे लेखन करत होते. करुणानिधींनी याशिवाय, "कुडियारासू'चे संपादकत्व केले, "मुथाराम'ला जीवदान दिले. सरकारी पत्रिका "तमीळ अरासू' सुरू होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ते सध्या तमीळ आणि इंग्रजीत प्रसिद्ध होत आहे. 

शंभरावर पुस्तकांचे लेखन 
करुणानिधी यांनी विपुल लेखन केले. त्यांची शंभरवर पुस्तके प्रकाशित झालीत. यातील काही प्रमुख पुस्तके अशी - रोमापुरी पांडियन, थेंगापडी सिंघम, वेल्लीकिझामाई, नेंजुक्कू निधी, इनियावाई रुबाथू, संगा थामिझ, कुरलवियम, पोन्नार संकर, थिरुक्कुरल उरई. 
गेली 75 वर्षे करुणानिधी तमीळ चित्रपटांसाठी पटकथा आणि संवादलेखन केले. त्याद्वारे त्यांनी समाजात जनजागृतीचे कार्य केले. तीनशेवर चित्रपटांसाठी लेखन केले. त्यांनी लेखन केलेल्या काही चित्रपटांवर बंदीचे प्रयत्न झाले, काही चित्रपटांच्या कथानकावरून गदारोळ झाला. तरीही त्यांनी आपली लेखणी कायम सुरू ठेवली. याच लेखनाने करुणानिधींना सामान्य जनतेपर्यंत नेले; त्यांच्या नावाचे गारूड प्रेक्षकांबरोबरच सामान्यांवरही झाले. त्यांतून त्यांच्या "डीएमके'ची लोकप्रियता वाढत गेली. करुणानिधी राजकारणातील प्रगतीची शिडी चढत गेले. करुणानिधींनी कविता, कादंबऱ्या, कथा, पत्रे, नाटके, ऐतिहासिक कादंबऱ्या, चित्रपटांसाठी गिते असे बहुविध लेखन केले. याचा पाया होता तो करुणानिधींनी शाळेत असताना सुरू केलेले "मानवनेशन' हे हस्तलिखित. तिरुवरूरच्या शाळेत असताना करुणानिधी हे हस्तलिखित चालवायचे. 

सहा खंडात आत्मचरित्र 
करुणानिधी यांचे आत्मचरित्र सहा खंडात प्रसिद्ध झाले आहे. त्याचे शीर्षक - "नेंजुक्कू निथी' असे आहे. करुणानिधींना आण्णामलाई विद्यापीठाने 1971 मध्ये आणि 2006 मध्ये मदुराई कामराज विद्यापिठाने सन्माननीय पदवी प्रदान केली होती. योगासने हे आपल्या दीर्घायुरारोग्याचे कारण असल्याचे सांगणारे करुणानिधी, पूर्वी सामिष भोजन घ्यायचे, पण आयुष्याच्या उत्तरकाळात पूर्णपणे शाकाहारी झाले होते. 
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख