karunanidhi-corruption-charges | Sarkarnama

#Karunanidhi भ्रष्टाचाराचे आरोप, वादाच्या फेरात अडकलेले करुणानिधी 

अभय सुपेकर
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप करुणानिधींवर सरकारिया आयोगाने ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्याच मुद्दावरून करुणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले.

पुणे : वीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप करुणानिधींवर सरकारिया आयोगाने ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्याच मुद्दावरून करुणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले.

चेन्नईतील उड्डाण पुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर करुणानिधी, माजी मुख्य सचिव के. ए. नांबियार आणि इतरांना अगदी पहाटे अटकही झाली होती. करुणानिधींचे विरोधक सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेली ही कारवाई गाजली होती. करुणानिधी, त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि पक्षकार्यकर्त्यांवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक असे अनेक आरोप ठेवले होते. तथापि, करुणानिधी आणि स्टॅलिन यांच्याविरोधात प्राथमिकदृष्ट्या कोणताही पुरावा सापडला नाही, असे चेन्नईतील मुख्य सत्र न्यायाधीश एस. अशोककुमार यांनी स्पष्ट केले. 

एलटीटीईला सहकार्याचा आरोप 
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्त्येबाबत चौकशी करणाऱ्या न्या. जैन आयोगाने आपल्या अंतरिम अहवालात करुणानिधी यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलमला (एलटीटीई) मदत केल्याचा आरोप ठेवला होता. गांधी यांच्या मारेकऱ्यांना सहकार्य केल्याबद्दल करुणानिधी, त्यांच्या पक्षाला जबाबदार धरावे, असे अंतरिम अहवालात नमूद केले होते; मात्र अंतिम अहवालात असे कोणतेही आरोप नव्हते. एप्रिल 2009 मध्ये करुणानिधींनी "प्रभाकरन (एलटीटीईचा म्होरक्‍या) माझा चांगला मित्र आहे', असा दावा केला होता. 

सेतुसमुद्रवरून वाद 
करुणानिधी यांनी सेतूसमुद्रम प्रकल्पावरूनही वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, "असं सांगतात की हजारो वर्षांपूर्वी राम होता. त्याने सेतुसमुद्र बांधला, असा दावा करून पुलाला हात लावू नका, असे सांगितले जाते. कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून राम अभियंता झाला होता,' अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यावरून भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर कडाडून टीकाही केली होती. 

घराणेशाहीचा आरोप 
नेहरू-गांधी घराण्यांप्रमाणे करुणानिधींनी "डीएमके'मध्ये घराणेशाही राबवल्याचा आरोप पक्ष कार्यकर्ते, त्यांचे समर्थक, विरोधक करत असतात. या मुद्दावरून ज्येष्ठ नेते वायको यांनी करुणानिधींवर हल्ला चढवला होता. राजकीय निरीक्षकांच्या मते वायको यांनी स्टॅलिन यांच्या स्थानाला सुरूंग लावण्याची क्षमता निर्माण केल्याने त्यांना पक्ष सोडणे भाग पाडले. "डीएमके'मधील अनेक नेते स्टॅलिन यांच्या पक्षातील उत्कर्षाबाबत नेहमीच भुवया उंचावतात. त्यावर टीकाही करतात. त्याला पक्षातील काहीजण स्टॅलिन यांनी स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केल्याचे सांगतात. 1975 मध्ये "मिसा'खाली अटक केलेल्या स्टॅलिन यांना पोलिसांनी एवढी बेदम मारहाण केली होती, ते जायबंदीच झाले होते. त्यांना वाचवण्याकरता आलेल्या कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला होता, याचीही ते आठवण करून देतात. करुणानिधी मुख्यमंत्री असताना स्टॅलिन 1989 आणि 1996 मध्ये आमदार होते, पण त्यांना मंत्रिमंडळात घेतले गेले नाही. 1996 मध्ये ते थेट जनतेतून निवडून येऊन चेन्नईचे महापौर झाले. स्टॅलिन चौथ्यांदा आमदार झाल्यावर त्यांना करुणानिधींच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले. 

करुणानिधी संबंध 
केंद्रीय मंत्री आणि करुणानिधी यांचे पुतणे मुरसोली मारन, 1969 मध्ये करुणानिधी मुख्यमंत्री झाले त्याच्याही आधीपासून राजकारणात सक्रिय होते. 1965 मध्ये अनेकदा त्यांना हिंदीविरोधी आंदोलनात अटक झाली होती. 1967 मध्ये मद्रासमधील पोटनिवडणुकीत मारनना उमेदवारी दिली होती, त्या वेळी त्यांच्या अर्जावर राजाजी, आण्णादुराई आणि मोहम्मद इस्माईल (कैद-ए-मिल्लत) यांच्या सह्या होत्या. त्यामुळे मारन यांची राजकीय वाटचाल करुणानिधींमुळे झाली, या सातत्याने केल्या जाणाऱ्या दाव्याला पुष्टी मिळत नाही. 
मुरसोली मारन यांचे पुत्र कलानिधी मारन यांचे सन नेटवर्क आहे. भारतातील श्रीमंतात त्यांचा समावेश होतो. कलानिधी यांना सहकार्य केल्याचा आरोप केला जातो. तथापि, पुन्हा कलानिधी यांनी स्वबळावर साम्राज्य उभे केले, असा दावा त्यांचे समर्थक करतात. हेच चॅनल "डीएमके'चे प्रवक्ते ठरले, त्याने आण्णा द्रमुक पक्षाच्या "जया टीव्ही'ला प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. 
करुणानिधी यांनी आपल्या कुटुंबातील उपद्रवी मंडळींवर कारवाई करण्यात हयगय केली, असाही आरोप केला जायचा. मात्र, करुणानिधींनी आपले पुत्र एम. के. मुथू आणि एम. के. अळगिरी यांचे चुकले तेव्हा त्यांच्यावर कारवाईही केली. केंद्रीय मंत्रिपदावरून दयानिधी मारन यांनाही हटवले. दिनकरन दैनिकाच्या कार्यालयावरील हल्ल्यात तिघे ठार झाले, या घटनेत अळगिरींवरही आरोप होता. "डीएमके'चे मंत्री कृतीनन यांच्या खुनातही अळगिरींवर आरोप होते. त्यातून त्यांना न्यायालयाने दोषमुक्त केले, त्यानंतर हा खटला उच्च न्यायालयात गेला आहे. करुणानिधींची कन्या कनिमोळी यांचे पक्षाप्रती फारसे योगदान नसतानाही त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. नंतर त्यांच्यावर टू जी स्पेक्‍ट्रम प्रकरणी आरोप ठेवले गेले. एवढेच नव्हे; तर स्टॅलिन यांना तमिळनाडूचे उपमुख्यमंत्रीपद देऊन तेच करुणानिधींचे राजकीय आणि कौटुंबिक वारस आहेत, हे बिंबवण्याचाही प्रयत्न झाला. 
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख