karunanidhi-agitation-against-Hindi | Sarkarnama

#Karunanidhi चळवळीचा अंगभूत गुण असलेले आंदोलक करुणानिधी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वयाच्या चौदाव्या वर्षी, 1932 मध्ये `जस्टिस पार्टी'च्या अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने करुणानिधी प्रभावीत झाले आणि राजकारणात उतरले. त्यांनी हिंदीविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी आपल्या गावाच्या परिसरात युवकांची संघटना बांधली.

पुणे : वयाच्या चौदाव्या वर्षी, 1932 मध्ये `जस्टिस पार्टी'च्या अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने करुणानिधी प्रभावीत झाले आणि राजकारणात उतरले. त्यांनी हिंदीविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी आपल्या गावाच्या परिसरात युवकांची संघटना बांधली. संघटनेतील सदस्यांपर्यंत आपले विचार पोचवण्यासाठी त्यांनी `मनावर नेशन' हे हस्तलिखित दैनिक सुरू करून, ते लोकांपर्यंत पोचवले. त्यानंतर त्यांनी, `तमिळनाडू तमिळ मनावर मानरम' ही युवकांची संघटना स्थापन केली. द्रविड चळवळीची पहिली युवक आघाडी यातून जन्माला आली. करुणानिधींनी युवकांना सोबत घेऊन परिसरातील झोपडपट्ट्यांना भेटी देऊन सामाजिक कार्य सुरू केले. आपल्या संघटनेसाठी त्यांनी दैनिक सुरू केले, पुढे त्याचेच `मुरसोली' या लोकप्रिय दैनिकात रूपांतर झाले. तेच पुढे पक्षाचे मुखपत्र बनले. 

आंदोलक करुणानिधी 
वयाच्या चौदाव्या वर्षी हिंदीविरोधी घोषणा देत करुणानिधी राजकारणात उतरले. त्यांनी पहिल्यांदा द्रविड चळवळीतील विद्यार्थ्यांची संघटना बांधली. कल्लाकुडी (त्यावेळचे डालमियापुरम) येथे करुणानिधींच्या नेतृत्वाखाली हिंदीविरोधी कडवे आंदोलन झाले. रेल्वे स्थानकावरील हिंदी पाट्या काढून तमीळ पाट्या लावल्या गेल्या. निदर्शकांनी रेल्वे मार्गावर ठाण मांडले. हिंसाचारात दोन ठार झाले. करुणानिधींना अटक झाली. या घटनेने तमिळनाडूच्या राजकारणात करुणानिधी हे नाव आक्रमकपणे पुढे आले. 
"तमिळनाडू तमीळ मनावर मंद्रम' आणि 10 ऑगस्ट 1942 रोजी "मुरसोली' ही दैनिके सुरू केली. 1957 मधील तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत करुणानिधी कुलीथलाई (जि. तिरुचिरापल्ली) मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. द्रविड मुन्नेत्र कळघमच्या वतीने (डीएमके) 15 उमेदवार तत्कालीन मद्रास विधानसभेवर निवडून गेले, त्यात करुणानिधी होते. 

कार्यकर्त्यांचे कलाइगनर 
वयाची 93 वर्षे गाठलेले तमिळनाडूतील ज्येष्ठ नेते एम. करुणानिधी यांनी राज्याच्याच नव्हे; तर देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवलेला होता. तमिळविरुद्ध हिंदी आंदोलनाचे ते प्रवर्तक होते. कार्यकर्त्यांमध्ये "कलइगनर' म्हणून परिचित करुणानिधींनी तीनदा विवाह केला. त्यांच्या पहिल्या पत्नी पद्मावती अम्मल, उभयतांना एम के मुथू हा मुलगा होता. त्याने रजतपटावर काही भूमिका केल्या, पण त्याचे तरुणपणीच निधन झाले. पद्मावती अम्मल याही तरुणपणी मरण पावल्या. त्यानंतर करुणानिधींचा दयालू अम्मल यांच्याशी विवाह झाला. उभयतांना एम. के. अळगिरी, एम. के. स्टॅलिन, एम. के. तमिलरासू आणि सेल्वी ही चार अपत्ये झाली. त्यानंतर करुणानिधींनी राजथिअम्मल यांच्याशी विवाह केला, उभयतांना खासदार कनिमोळी ही कन्या आहे. 
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख