karnataka state congress president issue | Sarkarnama

डी. के. शिवकुमार काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

बंगळूर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी माजी मंत्री एम. बी. पाटील किंवा आपल्या समर्थकांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, असा आग्रह कॉंग्रेस हायकमांडकडे धरला आहे. सिद्धरामय्या गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. 

बंगळूर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी माजी मंत्री एम. बी. पाटील किंवा आपल्या समर्थकांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, असा आग्रह कॉंग्रेस हायकमांडकडे धरला आहे. सिद्धरामय्या गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा करण्यासाठी हायकमांडने सिद्धरामय्या यांना दिल्लीला पाचारण केले होते, त्यानुसार ते दिल्लीला गेले असून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल, ए. के. अँटनी, राज्याचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्नाटकातील कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीबाबत सोनिया गांधी यांनी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असतो, कोणाचे वैयक्तिक हित येथे मुख्य नाही. एकाचवेळी सर्वांना अधिकार मिळत नाहीत. यासाठी पुढील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्ष संघटना करा, सर्वजण संघटितपणे पक्ष संघटना बळकट करा, असे सोनिया गांधी यांनी त्यांना सांगितले. 

त्यानंतर सिद्धरामय्या यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेऊन एम. बी. पाटील यांच्यासाठी आग्रह धरला. माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांना कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे, यासाठी गुलाम नबी आझाद, अहमद पटेल व इतर नेत्यांनी हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे के. सी. वेणुगोपाल, ए. के. अँटनी यांनी सिद्धरामय्या सुचवतील त्याच उमेदवाराला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, असा सल्ला दिला आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच मतभेद असल्याने राज्याच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले आहे. शेवटच्या टप्प्यात डी. के. शिवकुमार व एम. बी. पाटील यांच्यातच प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, मुनीयप्पा, कृष्ण बैरेगौडा, रामलिंगा रेड्डी यांनीही प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख