कर्नाटकात कॉंग्रेसची खेळी यशस्वी

कर्नाटकाच्या सिंहासनावर येनकेनप्रकारे बसलेल्या भाजपला खाली खेचण्यात कॉंग्रेसची खेळी आज यशस्वी झाली.
कर्नाटकात कॉंग्रेसची खेळी यशस्वी

पुणे : कर्नाटकाच्या सिंहासनावर येनकेनप्रकारे बसलेल्या भाजपला खाली खेचण्यात कॉंग्रेसची खेळी आज यशस्वी झाली.  

कर्नाटकामध्ये 224 पैकी 222 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल 15 मे रोजी जाहीर झाला. त्यात 103 जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. कॉंग्रेसने 78, धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) 37, बसपने 1 जागा जिंकली. दोन आमदार अपक्ष निवडून आले. 

कर्नाटकमध्ये बहुमताचा आकडा कोणालाच गाठता न आल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. मात्र सत्तेच्या शर्यतीत भाजपने कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीवर कुरघोडी केली. सत्तेची माळ स्वतःच्या गळ्यात पाडून घेण्यात भाजप यशस्वी झाली. 

भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी बी. एस. येडियुरप्पांची निवड केली. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आमदारांचे समर्थन पत्र सादर केले. जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांची नेतेपदी निवड केली. त्यांनीही जेडीएससह कॉंग्रेसच्या आमदारांचे समर्थन पत्र दिले. मात्र रात्री भाजपने ट्विट करीत येडियुरप्पा उद्याच शपथ घेतील, असे जाहीर करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे राज्यपालांनी औपचारिक निर्णय घेऊन भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यास न्यायालयात किंवा राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचा इशारा कॉग्रेसने दिला होता. या वेळी `मन की बात अब धन की बात होनेवाली है,' अशी टीप्पणीही कॉंग्रेसने केली होती.  माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, कपिल सिब्बल,विवेक तनखा आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट करीत, राज्यपालांना घटनात्मक जबाबदारीची आठवण करून दिली होती. 

या सर्व गदारोळात कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करताच, इशारा दिल्यानुसार कॉंग्रेस आणि जेडीएसने न्यायालयाचे दार ठोठावले. राज्यपालांच्या निर्णयाच्या निषेधार्थ विधानसौंध परिसरात दोन्ही पक्षांनी धरणे आंदोलनही केले. 

कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने  भाजपची खेळी भाजपच्याच अंगलट आली. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह बसला. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची हैदराबादमध्ये काल दिवसभर खलबते झाली. बहुमताच्या परीक्षेबाबत कॉंग्रेसश्रेष्ठींनी त्यांच्या आमदारांना धडे दिले. सिद्धरामय्या यांची कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. जेडिएसनेही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्येच ठेवले होते. 

कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज चार वाजता विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश दिला. बहुमताच्या आकड्यांचा खेळ न जमल्याने अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आजच्या अग्निपरीक्षेत फेल झाले आणि कॉंग्रेसची खेळी यशस्वी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com