Karnataka CM Yediyurappa in Trouble due to New MLAs | Sarkarnama

मुख्यमंत्री येडियुराप्पा कात्रीत : हायकमांडच्या असहकार्यामुळे अडचणीत भर

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

कॉंग्रेस, धजदचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी निकालानंतर 24 तासात मंत्रिमंडळात सामावून घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र, पोटनिवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही

बंगळूर : विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या 11 आमदारांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना डेडलाईन दिली आहे. 18 ते 20 जानेवारी दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार करुन आम्हाला त्यात सामावून घ्यावे, असे त्यांनी बजावले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री येडियुराप्पा कात्रीत सापडले आहेत. एकीकडे आमदारांचा इशारा तर दुसरीकडे भाजप हायकमांडचे असहकार्य असा पेच त्यांच्यासमोर आहे.

कॉंग्रेस, धजदचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी निकालानंतर 24 तासात मंत्रिमंडळात सामावून घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र, पोटनिवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यासंदर्भात चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजप हायकमांड मुख्यमंत्र्यांना वेळ द्यायला तयार नाही. त्यामुळे, नूतन आमदारांची अस्वस्थता वाढली आहे. मंत्रीपद मिळणार की नाही, याबद्दलचा संभ्रम वाढल्याने त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची डेडलाईन देऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यास सुरवात केली आहे.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा दिल्या. संक्रांतीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी नूतन आमदारांना अलीकडेच सांगितले होते. मात्र, संक्रांत एका दिवसावर येऊन ठेपली तरी अद्याप कोणत्याच हालचाली सुरु नाहीत. भाजप हायकमांड मुख्यमंत्र्यांशी चर्चाही करायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर नूतन आमदारांनी रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा बैठका घेऊन चर्चा केली. आमच्या त्यागामुळेच राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले. आम्हाला मंत्रीपद देण्याचा शब्दही दिला. परंतु, अद्याप त्याचे पालन झालेले नाही, अशी नाराजी त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

मध्यंतरी येडियुराप्पा यांनी 11 व 12 जानेवारी रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्‍चित करणार असल्याचे म्हटले होते. यासाठी त्यांनी संबंधितांची वेळही मागितली होती. परंतु, त्यांना अद्याप वेळ मिळालेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 18 जानेवारी रोजी हुबळी व बंगळूरला येणार आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन निर्णय घ्यावा, असा आग्रह नूतन आमदारांनी धरला आहे.

स्वित्झर्लंड दौऱ्यामुळे पेचात भर
दावोसमध्ये 20 जानेवारीपासून होणाऱ्या जागतिक आर्थिक संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी येडियुराप्पा स्वित्झर्लंडला जाणार आहेत. पण, राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी आपला दौरा रद्द करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वित्झर्लंडमधील संमेलनात उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याचे बजावल्याने ते दावोसला जाण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख