कर्नाटकमध्ये विश्‍वास ठराव सोमवारपर्यंत लांबणीवर, राज्यपालांच्या हस्तक्षेपावरून वाद

 कर्नाटकमध्ये विश्‍वास ठराव सोमवारपर्यंत लांबणीवर, राज्यपालांच्या हस्तक्षेपावरून वाद

बंगळूर : युतीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेचे गुऱ्हाळ आजही चालले. दिवसभर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकमेकावर आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. आमदारांच्या घोडेबाजाराचा विषयही सभागृहात गाजला. सायंकाळी कॉंग्रेस-धजद युतीच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज स्थगित ठेऊन सोमवारपर्यंत लांबणीवर टाकण्याचा आग्रह धरला, तर भाजपने कितीही वेळ झाला तरी आजच मतदान घेण्याची मागणी लावून धरली. अखेर रात्री 8.30 वाजता अध्यक्ष रमेशकुमार यांनी सोमवारपर्यंत (ता. 22) कामकाज तहकूब केले. 

राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्र्यांना आजच विश्वादर्शक ठरावावर मतदान प्रक्रीया पूर्ण करण्याची दोन वेळा सूचना केली. राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा हक्क आहे किंवा नाही, यावरूनही बराच वाद झाला. सकाळी 11 वाजता विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाच्या अधिवेशनाला सुरवात झाली. अध्यक्ष रमेश कुमार यांनी विरोधी आमदारांनी आपल्या चारित्र्यावर शंका घेतल्याने रोष व्यक्त केला. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी उपस्थित केलेल्या पॉईँट ऑफ ऑरडरवर आपला निकाल राखून ठेवला असल्याचे ते म्हणाले. काही मिनिटांपूर्वी ऍडव्होकेट जनरलनी या विषयावर आपले लेखी मत दिले आहे. त्याचे मी अजून वाचन करावयाचे आहे, असे सभापतींनी सांगितले. 

सभापतींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी बोलू लागताच सभागृह शांत झाले. या मुद्यावर ते सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याचे स्पष्टीकरण त्यांनी केले नाही. कुमारस्वामी यांनी 2006 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून आपण मुख्यमंत्री कसे झालो याचा पुनरुच्चार केला. 

भाजपला घाई का? 
2008 मध्ये जेव्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री बनले, तेव्हा दोन महिन्यातच पाच अपक्ष आमदारांनी मला आपले समर्थन देऊन सरकार अस्थिर करण्याचा सल्ला दिला. परंतु मी त्यांना प्रोत्साहन दिले नाही, असे कुमारस्वामी म्हणाले. सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे राजकीय नाटक आता थांबले पाहिजे. भाजपनेच सत्ताधारी आमदारांचे राजीनामे घेऊन सत्ता मिळविण्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यामुळेच 17-18 आमदारांनी राजीनामे दिले असल्याचा त्यांनी आरोप केला. 

कुमारस्वामी पुढे म्हणाले "येडियुरप्पा म्हणतात की कोणत्याही वादविवादाची आवश्‍यकता नाही, मतदान करा, परंतु एका दिवसात जेव्हा राज्यचा इतिहास लिहीला जातो तेव्हा त्याचे रेकॉर्ड होणे आवश्‍यक आहे. मी सत्तेचा दुरुपयोग केला नाही.' सत्तेवर येण्याची घाई काय आहे, असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना केला. "मी सत्तेसाठी भीक मागणार नाही किंवा सत्तेला चिकटूनही नाही. 2009 मध्ये जेव्हा भाजपचे 57 आमदार रिसॉर्टवर गेले आणि सरकार संपुष्टात आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्षमा करण्याची विनंती केली होती. "मी आज त्याच स्थितीत आहे, परंतु मी कोणालाही विनंती करणार नाही. ते म्हणाले, भाजपने आज 303 जागा जिंकल्या असल्या तरी मला भाजपला स्मरण करून द्यायचे आहे, की राजीव गांधींनी 400 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. आज त्या पक्षाची स्थिती काय आहे. कोणतीच गोष्ट कायमस्वरुपी असते असे मानू नये.' "मला सत्ता गमावण्याची काळजी नाही. मी या खुर्चीवर बसलेल्या दिवसापासून खाली उतरण्यासाठी तयार होतो. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर भाजप सरकार किती स्थिर असेल, हे मला पहावयाचे आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. 

रेवण्णांची मंदिरास भेट का?' 
आपले बंधू रेवण्णा यांच्यावर टीका केल्याबद्दल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर हल्ला केला. तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलता आणि मंदिराकडे जाणाऱ्या लोकांवर टीका करता, हे किती येग्य आहे, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. रेवण्णा काळी जादू (ब्लॅक मॅजिक) करीत असल्याचा आरोप आहे. होय, आम्ही देवावर विश्वास ठेवतो पण मी कोणत्याही देवतेसमोर उभे राहून सांगू शकतो की माझे कुटुंब काळ्या जादूचा वापर करत नाही. सरकारला काळ्या जादूने वाचवता येत नाही, असे ते म्हणाले. 
मुख्यमंत्री येतात आणि जातात, पण आमदारांना सत्ता देणाऱ्या लोकांना उत्तर द्यावे लागते, असे ते म्हणतात. "तुम्ही मला फसवू शकता, पण तुमच्या मतदारसंघातील लोकांना नाही.' असे ते म्हणाले. 
सभापतींचे अभिनंदन 
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांचे सभागृह सुरळीतपणे चालविल्याबद्दल अभिनंदन केले. भाजप विश्वासदर्शक ठरावावर चर्चा घडवून आणण्यास विरोध करीत आहे. परंतु 2010 मध्ये जेव्हा अशीच समस्या होती, तेव्हा विधानसभेत पोलीस आले होते. तेव्हा परवानगी होती का? असा त्यांनी प्रश्न केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये विश्वास प्रस्तावावर 10 दिवस चर्चा घडवून आणल्याचे त्यांना स्मरण करून दिले. मग आताच इतकी घाई का?" असा त्यांनी प्रश्न केला. लोकशाहीत वादविवादाला महत्व आहे. असे ते म्हणाले. 

कोलारचे धजदचे आमदार श्रीनिवास गौडा यांना 5 कोटीचे अमिष दाखविण्यात आले. त्यांना देण्यात आलेले पैसे त्यांनी परत केले, हे कसले लक्षण आहे, असा त्यांनी प्रश्न केला. मंत्री कृष्णा बेरेगौडा यांनी, दुष्काळाच्या हंगामात आकाशातून पैशाचा पाऊस पडला का? असे विचारले. सर्वकाही रेकॉर्डवर होऊ द्या, लोकांना काय घडते आहे कळू द्या, असे सांगून सभाध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांवर आक्षेप घेतल्याचा आरोप केला. "मी पूर्ण वेळ देईन. सर्वकाही बाहेर येऊ द्या जेणेकरुन लोक लक्षात घेतील.' 

भाजपकडून घोडेबाजार 
धजदचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी भाजप नेत्यांनी घोडाबाजार केल्याचा आरोप सभागृहात केला. ते म्हणाले "मल्लेश्वरमचे आमदार अश्वथ नारायण, यलहंकाचे आमदार एस. आर. विश्वनाथ आणि माजी आमदार योगेश्वर यांनी मला 5 कोटी दिले. मी नकार दिला आणि मी अशी व्यक्ती नसल्याचे त्यांना सांगितले. आता ते मला 30 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवित आहेत. मला पैसे दिले हे खरे आहे. जर मी खोटे बोलत असल्याचे त्यांना वाटत असेल तर मी ते सिद्ध करण्यास तयार आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृष्णा बैरेगौडा यांनी या आरोपाच्या चौकशीची मागणी केली. मंत्री एस. आर. महेश यांनीही घोडेबाजाराचा आरोप केला. यानंतर, अध्यक्षांनी या सर्व आरोपांची नोंद घ्यावी लागेल असे सांगून कर्नाटकाच्या लोकांना राजकारण कोणत्या पातळीवर जात आहे, ते कळू द्या," असे ते म्हणाले. 

राज्यपालांवर नाराजी 
"बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दीडची डेडलाईन दिली आहे. मी आधीच विश्वास प्रस्ताव सादर केला आहे. मी ते तुमच्या विवेकबुद्धीनुसार सोडून संविधानिक तरतुदी कशा प्रकारे अंमलात आणल्या जात आहेत याबद्दल वादविवाद करणे आवश्‍यक आहे. ते इतक्‍या कमी वेळेत पूर्ण केले जाऊ शकतात का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी असा युक्तिवाद केला की, हा मामला वेगळा आहे. येथे मुख्यमंत्री यांनी आधीच विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे. आमचा घटनेत राज्यपाल किंवा सभाध्यक्ष हुकूमशाहा होऊ शकत नाहीत, श्री. कृष्णा बैरेगौडा यांनी या प्रकरणात राज्यपाल हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगितले. 

श्रीमंत पाटील यांचा खुलासा 
कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या अनुपस्थितीवर अध्यक्षांनी स्पष्टीकरण केले. त्यांनी पाठविलेल्या ईमेलचे वाचन करण्यास सांगितले. त्यात त्यांनी (पाटील) म्हटले आहे. की ते वैयक्तिक कामासाठी चेन्नईला जात असताना त्यांना छातीत वेदना जाणवल्या. त्यावर फॅमिली डॉक्‍टरांशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईतील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, तेथे उपचार केले जात आहेत. भाजपकडून आपले अपहरण झाले नसल्याचे सांगून त्यांनी सभाध्यक्षांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित भागातून वगळण्याची परवानगी मागितली आहे. 

राज्यपालांविरोधात घोषणा 
भाजपचे आमदार सी. सी. मधुस्वामी म्हणाले की अधिवेशन आणि सरकार वेगळे आहेत. सरकारचा प्रमुख या नात्याने कोणत्याही क्षणी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याचा अधिकार राज्यापालांना आहे. कृष्ण बैरेगौडा व आर. व्ही. देशपांडे यांनी यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, सभागृहाचा विश्वास सिध्द करून घेण्यास सांगण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. परंतु एकदा विश्वासदर्शक ठराव सभागृहात सादर झाल्यानंतर त्यावरची प्रक्रीया पूर्ण करण्याची जबाबदारी सभाध्यक्षांची आहे. यावेळी कॉंग्रेस व धजदच्या सदस्यांनी राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपाल आमित शहांचे एजंट असल्याचा त्यांनी आरोप केला. " गो बॅक गव्हर्नर ' अशा त्यांनी घोषणा दिल्या. 
विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी चर्चा पूर्ण होईपर्यंत विश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभेच्या नियमांनुसार चर्चा संपल्यानंतर मतदानासाठी मोशन ठेवता येते. मी सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही. राज्यपालांची सूचना मुख्यमंत्र्यांना आहे, मला नाही. त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे की नाही हा त्यांचा विषय आहे. मी सभागृहाच्या नियमांनुसार अधिवेशन चालवित आहे", असे ते म्हणाले. 

मतदान घेण्यावरून शाब्दिक चकमक 
कॉंग्रेस व धजद सदस्यांनी आज चर्चा अपूरी झाल्याने कामकाज सोमवारपर्यंत स्थगित ठेऊन त्यानंतर मतदानावर निर्णय घेण्याची मागणी केली. त्याला भजपच्या सदस्यांनी आक्षेप घेऊन आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचा आग्रह धरला. यावर डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, कृष्ण बैरेगौडा, एच. डी. रेवण्णा यांनी सोमवारपर्यंत चर्चा पुढे ढकलण्याचा आग्रह कायम ठेवला. कॉंग्रेस व धजदच्या कांही आमदारांना बंधनात ठेवले असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला. परंतु सभाध्यक्षांनी या संबंधात आपल्याकडे तक्रार आली नसल्याने आपण कांहीच करू शकत नसल्याचे सांगितले. त्यावर गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी श्रीमंतगौडा पाटील यांना भेटण्यासाठी पोलिसांना पाठविले असता भेट घेऊ दिली नाही, इतर आमदारांनाही भेट घेऊ दिले नसल्याचे सभाध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यायात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com