karnata congress mla touch with devendra fadavnis | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस करणार येडीयुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील हस्तक्षेपास सतीश जारकीहोळी यांनी आक्षेप घेतला अाहे.

बंगळूर : बेळगावच्या पीएलडी (प्राथमिक भू-विकास) बॅंकेच्या राजकारणामुळे युती सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जारकीहोळी बंधूंनी अपमानाचा सूड घेण्यासाठी 14 आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची तयारी चालविली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रमेश जारकीहोळी यांनी संपर्क साधला असून, सतीश जारकीहोळी यांनीही 15 दिवसांत काहीही घडू शकते, असे सांगितले आहे. 

पीएलडी बॅंकेच्या निवडणुकीवरून पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे हेब्बाळकर यांच्या गटाचे पदाधिकारी बॅंकेत विजयी झाले. जारकीहोळी बंधूंना हे रुचले नसल्याने त्यांनी पक्षालाच आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत त्यांनी सूत्रे हलविण्यास सुरवात केल्याचे समजते. 

भाजप प्रवेशासाठी रमेश जारकीहोळी यांनी फडणवीस यांच्यासमोर चार अटी ठेवल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद, सहा आमदारांना मंत्रिपद, पोटनिवडणुकीचा खर्च भाजपने करावा, मतदारसंघांना अतिरिक्त अनुदान द्यावे, अशा त्या अटी आहेत. डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील हस्तक्षेपास सतीश जारकीहोळी यांनी आक्षेप घेतला असून, आमच्या जिल्ह्याचे राजकारण कसे करावयाचे आम्हाला चांगले माहीत आहे, पुढील 10 वर्षांत आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख