कर्नाडांनी संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या भाषणात दिले होते बाळासाहेब ठाकरे यांना नेमके उत्तर...

 कर्नाडांनी संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या भाषणात दिले होते बाळासाहेब ठाकरे यांना नेमके उत्तर...

नगर : ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या निधनाचे वृत्त आले आणि नगरकरांना आठवण झाली ती साहित्य संमेलनातील गिरीश कर्नाडांच्या राजकीय भूमिकेच्या दर्शनाची. एक अभिनेते म्हणून कर्नाड जेवढे आग्रही आणि स्वतःच्या ताकदीबद्दल प्रचंड विश्‍वास असलेले असे होते तेवढेच राजकीय प्रश्‍नांवर ते थेट आणि ठाम भूमिका घ्यायचे त्यामुळे नगरमध्ये 97 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून भाषण करताना त्यावेळच्या परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची आपली मते नेमकेपणाने मांडली होती. 


नगरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1997 मध्ये झाले. ते सत्तरावे संमेलन होते. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा मुद्दा त्या वर्षीखूप गाजला होता. नंतर या संमेलनात झालेला गोंधळ नगरकरांच्या आजही लक्षात आहे. नगरमध्ये 97 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 3, 4, 5 जानेवारीला साहित्य संमेलन झाले. 

तीन दिवस साहित्य रसिकांना मेजवानी मिळाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख स्वागताध्यक्ष होते. लाखोंची गर्दी जमल्याने त्या काळी गडाखांचे खास अभिनंदनही झाले. गुलजार, बासू भट्टाचार्य, अण्णा हजारे, डॉ. श्रीराम लागू, आचार्य किशोर व्यास, पं. ह्यदयनाथ मंगेशकर, बाबा महाराज सातारकर, शांदा शेळके, विं. दा. करंदीकर आदी मान्यवरांची त्या वेळी उपस्थिती होती. ज्ञानेश्वरनगरी असे या संमेलनस्थळाचे नाव होते. तीन तारखेस गिरीश कर्नाड यांनी संमेलनाचे उदघाटन केले. अस्सल मराठीत त्यांनी भाषण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. कर्नाड म्हणाले होते, ""एक जुलुमशाही दुसऱ्या जुलुमशाहीला तोंड देऊ शकते. पाशवी शक्तींशी मुकाबला करणेही तिला जमते. परंतु वैचारिक लढाई किंवा सर्जनशीलता यांच्याशी मुकाबला करणे तिला जमत नाही. कारण विचार आणि सर्जकता यांच्यावर कोणाचीही हुकुमत चालू शकत नाही,"" असे विचार कर्नाड यांनी व्यक्त केले होते. 

असा झाला होता वाद 
ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका केल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निषेध करणारा ठराव या संमेलनात संमत करावा, अशी मागणी काही जणांनी केली होती. त्याबाबत स्वागताध्यक्ष यशवंतराव गडाख यांच्याशी अनेकांनी चर्चा केली होती. संमेलनात या संदर्भात एक ठराव संमत करण्यात आला. मात्र त्यात ठाकरे यांचा नामोल्लेख नव्हता. लेखक-कलावंतांना दडपू पाहणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध या ठरावाद्वारे करण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगीही याच मुद्यावरून काही जणांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. परस्पर विरोधी घोषणाबाजीने काही काळ कार्यक्रम थांबला होता. अखेर रसिकांनीच घोषणा देणाऱ्यांना खाली बसण्यास भाग पाडले. त्यानंतर समारोप सुरळीत होऊ शकला होता. ही आठवण नगरकरांना आजही ताजी आहे. 

आम्ही आंदोलन केले होते : राठोड 
आंदोलनाच्या आठवणी सांगताना शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड म्हणाले, "" गिरीश कर्नाड ज्येष्ठ आणि चांगले अभिनेते होते संमेलनातले त्यांचे भाषणही गाजले होते. साहित्य संमेलनात ठाकरे साहेबांच्याबाबत निषेधाचा ठराव करण्यात येत असल्याचे कळल्यानंतर आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते संमेलनास्थळी गेलो. तेथे आम्ही आंदोलन केले होते. त्या वेळी मोठा गदारोळ झाला. पोलिसांनी आम्हाला त्या प्रकरणात आरोपी केले होते. ते मोठे आंदोलन झाले होते हे आंदोलन राज्यभर गाजले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com