आयोगाची चपराक मिळूनही कपिल मिश्रांचा ताठा कायम...

मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. सत्य बोलण्यास कोणाची भिती आहे ? मी सत्यावर ठाम आहे - कपिल मिश्रा, भाजप.
 आयोगाची चपराक मिळूनही कपिल मिश्रांचा ताठा कायम...

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे निकटवर्ती व सध्या भाजपवासी झालेले कपिल मिश्रा यांनी दिल्लीच्या निवडणुकीला भारत-पाकिस्तान चा रंग दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना चपराक लगावली आहे. आयोगाने मिश्रा यांना नोटीस बजावताना हे वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याचा निर्देश सरळ ट्‌विटरलाच दिला आहे. भाजपने मात्र प्रचाराचा केंद्रबिंदू शाहीन बागेतील आंदोलन व सीएएला विरोध करणाऱ्यांवर पाकिस्तान समर्थक असा शिक्का मारून प्रचार याच मुद्यांभोवती केद्रीत ठेवण्याचे ठरविल्याचे उघड दिसत आहे. 

दरम्यान कपिल मिश्रा यांनी आयोगाच्या नोटीसनंतरही "मी सत्य तेच बोललो व शाहीन बागेत देशविरोधी शक्ती एकत्र जमल्या आहेत,' असा अरेरावीचा खुलासा केला. यामुळे त्यांना कोणाचा भक्कम पाठिंबा आहे हेही सत्य समोर आले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी मिश्रा यांच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला उत्तर देताना दिल्लीत हिंदुस्तानचा विजय होईल, असे प्रत्युत्तर दिले. 

दिल्लीत थंडीचा जोर कमी कमी होत चालला असताना प्रचाराची हवा तापत चालली असून मिश्रा यांच्या ट्विटनंतर याला वेगळेच वळण मिळाले आहे. शाहीन बागेतील आंदोलनामुळे कालिंदी कुंजपासून बदरपूरपर्यंतच्या परिसरातील किमान 10 ते 15 मतदारसंघातील रहिवासांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याचा फायदा घेऊन या मतदारसंघांत मुसंडी मारण्याचे भाजपचे बेत दिसत आहेत. मिश्रा यांनी काल, शाहीन बागेत देशविरोधी नारेबाजी केली जात असल्याचा आरोप करताना, 8 फेब्रुवारीला दिल्लीच्या रस्त्यांवर भारत विरूध्द पाकिस्तान असा महामुकाबला होईल असे ट्‌विट केले. 

या खोडसाळपणाची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने आज त्यांना नोटीस बजावली. संबंधित ट्विट डिलीट करण्याचे निर्देशही आयोगाने मिश्रांना नव्हे तर खुद्द ट्‌विटरला दिले व धार्मिक विद्वेषपूर्ण प्रचारावर आपली बारीक नजर असल्याचा इशारा दिला. मात्र आयोगाच्य मर्यादा लक्षात घेता भाजपमधील मिश्रा यांच्या कितीतरी वरच्या फळीत असेलल्या नेत्यांनी प्रचारात अशीच वक्तव्ये दिली तर आयोग काय करू शकतो याबाबत उत्सुकता आहे. भाजप नेते अमित शहा, जे पी नड्‌डा यांनी आज दिल्लीत ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. 

शहा यांनी पक्षाध्यक्षपदावर जे पी नड्डा यांना नामधारी नियुक्त करण्यापूर्वीच दिल्लीच्या निवडणुकीत आपण स्वतः लक्ष घालत असल्याचे संकेत भांडाभांड करणाऱ्या स्थानिक भाजप नेत्यांना दिले आहेत. त्यांनी आज गोकलपुरीसह गरीबांची संख्या असलेल्या यमुनेच्या पलीकडच्या तीन भागांत सभा घेतल्या. शहांच्या सभांचा सिलसिला यापुढेही कायम रहाणार आहे. 

दरम्यान मिश्रा यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतीक्रिया दिली. ते म्हणाले की मला काल रात्रीच आयोगाची नोटीस दिली. मी आज त्यांना उत्तर देईन. पण या देशात सत्य बोलणे हा गुन्हा नाही. मी चुकीचे काहीच बोललेलो नाही व माझ्या विधानावर मी ठाम आहे. शाहीन बागेतील आंदोलनकर्त्यांकडून शालेय विद्यार्थी, रूग्ण व नोकरदारांची प्रचंड अडवणूक व छळ होत आहे. हे आंदोलक देशाच्या घटनेला व उच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत त्यांना देशविरोधी नाही तर दुसरे काय म्हणायचे हे कोणी सांगावे. शाहीन बागेत दहशतवादी आंदोलन सुरू आहे. 

उपमुख्यमंत्री सिसोदीया यांनी, 11 फेब्रुवारीला दिल्लीत हिंदुस्तान विजयी होईल त्यामुळे आपल्याला कोण व्हायचे हे भाजपने ठरवायचे आहे,'' असे प्रत्युत्तर दिले. शिक्षण, वीज, आरोग्य, महिला सुरक्षा, महागाई या मुद्यांपासून भाजप दूर पळत असल्यानेच त्यांना पाकिस्तानसारखे मुद्दे दिल्लीत आणण्याची वेळ आली असाही हल्ला त्यांनी चढविला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com