कन्नड मतदारसंघातून कॉंग्रेसकडून पवार, पाटील, कोल्हे इच्छूक

कन्नड मतदारसंघातून कॉंग्रेसकडून पवार, पाटील, कोल्हे इच्छूक

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे या तिघांनी या मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणुकीत केलेली बंडखोरी आणि शिवसेनेचा झालेला पराभव यामुळे सध्या चांगलेच प्रकाशझोतात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पुन्हा मैदानात असणार आहेत. अशावेळी शिवसेना विरुध्द जाधव संघर्षात कॉंग्रेस संधी पाहत आहे. 

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 80 हजाराहून अधिक मते मिळवत शिवसेनेच्या गडाला हादरा दिला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पहिला राजीनामा देणारा आमदार म्हणूनही जाधव परिचीत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता त्यांनी देखील विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. 
हर्षवर्धन जाधव यांना विधानसभेला पराभूत करून लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्याच्या निर्धार शिवसेनेने केला आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ याप्रमाणे कॉंग्रेस कन्नडमध्ये पुन्हा जम बसवू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला तालुक्‍यातून 11 हजार 285 इतकी नगण्य मते मिळाली होती. मात्र याकडे फारसे लक्ष न देता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत आहे. 

कॉंग्रेस नवा चेहरा देणार? 
लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट, राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपला अनुकूल असे वातावरण असतांना कॉंग्रेस कन्नडमध्ये नव्या चेहऱ्याला संधी देणार? की मग पुन्हा जुन्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याबद्दल मतदारसंघात उत्सूकता आहे. सध्या तरी पक्षाकडे कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे या एकमेव नव्या चेहऱ्याने उमेदवारी मागितली आहे. 

अन्य दोन इच्छुकांमध्ये 2004 मध्ये शिवसेनेकडून निवडून आलेले आणि आता कॉंग्रेसचे शहराध्यक्ष असलेले माजी आमदार नामदेव पवार यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदावर निवड झालेले माजी आमदार नितीन पाटील यांनी देखील मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. पाटील यांनी देखील पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. नितीन पाटील 1999 मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com