कणकवलीत हाय व्होल्टेज ड्रामा : शिवसेनेने राणें विरुद्ध सावंतांचा अर्ज ठेवलाच 

कधी काळी राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत सर्वाधिक चुरशीची लढत होणार आहे. राणेंसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
NiteshRane__Uddhav Thakre
NiteshRane__Uddhav Thakre

सावंतवाडी : शिवसेनेने आमदार नितीश राणें यांच्या विरुद्ध सतीश सावंतांचा अर्जमागे घेतला नाही . त्यामुळे राज्यात शिवसेना - भाजप यांच्यात युती असली तरी कणकवलीत दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध लढणार आहेत . ही लढत मैत्रीपूर्ण नक्कीच नसेल.   

कणकवली विधानसभा जागेसाठी सगळ्यात जास्त चुरस अपेक्षित आहे. युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपकडे गेली; मात्र याचवेळी नारायण राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करून कमळ हाती घेण्याच्या तयारीत होते. येथील उमेदवारी विद्यमान आमदार व राणेंचे पुत्र नितेश राणे यांना दिल्यास शिवसेना आपला उमेदवार देईल असा इशारा देण्यात आला होता.

भाजपने शेवटच्या टप्प्यात नितेश यांना भाजपात घेवून उमेदवारी दिली. याच दरम्यान राणेंची साथ सोडलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना शिवसेनेने एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिली. यामुळे युती असूनही येथे कमळ आणि धनुष्यबाणात लढाई होणार आहे.

शिवसेना भाजप युती झाली, नारायण राणे बर्‍याच अंशी भाजपात आले, तरी सिंधुदुर्गात शिवसेना आणि राणे या पारंपारीक स्पर्धकातच संघर्ष होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. कधी काळी राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत सर्वाधिक चुरशीची लढत होणार आहे. राणेंसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कोणीही निवडून आला तरी सरशी मात्र युतीचीच होईल अशी आजची स्थिती आहे.   

सिंधुदुर्ग म्हटला की नारायण राणे हे राजकीय समीकरण गेल्या तीस वर्षात महाराष्ट्रात रूढ झाले. यामुळे छोटा जिल्हा असूनही पूर्ण राज्याचे येथील निवडणुकांवर लक्ष असते. 1990 पासून राणेंच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात शिवसेनेचा झंझावात सुरू झाला. त्यांनी 2004 ला शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

यामुळे एका रात्रीत काँग्रेस नंबर एकचा पक्ष तर शिवसेना झिरोवर  आली. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मात्र चित्र पालटले. राणेंचे एक-एक सत्तास्थान शिवसेनेने काबीज करायला सुरूवात केली. शिवसेना आणि राणे यांच्या राजकीय संघर्षात बरेच चढउतार दिसले तरी आगामी निवडणुकीत राणेंसाठी अस्तित्वाची तर शिवसेनेसाठी वर्चस्वाची लढाई असणार आहे.

राणेंच्या प्रवेशामुळे भाजपमधील एक मोठा गट सावंत यांना उघड पाठींबा देत आहे. शिवसनेने येथे मतविभागणी टाळण्यासाठी भाजपमधील बंडखोर संदेश पारकर यांचे उमेदवारी मागे घेण्यासाठी मन वळविले आहे. सावंत यांचा संघटना बांधणीत हातखंडा आहे. राणेंची पारंपारीक व्होट बँक असलेल्या कणकवली तालुक्यात सावंत यांचा चांगला प्रभाव आहे. सावंत, रावराणे घराण्याची मते येथे प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.

राणेंचाही हा बालेकिल्ला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी या शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थामधील सत्ता, नितेश राणेंचे वैयक्तीक काम, जनसंपर्क, भाजपच्या चिन्हामुळे मिळणारी पारंपारीक मते आणि राणेंविषयी या मतदार संघातील वलय हे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. येथे काँग्रेसने माजी आमदार अमृतराव राणे यांचे पुत्र सुशिल राणेंना उमेदवारी दिली आहे; मात्र खरी लढत राणे- सावंत यांच्यातच होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com