Kandivali :Atul Bhatkhalkar BJP Vs Ajanta Yadav Congress | Sarkarnama

कांदिवली : अतुल भातखळकर यांना अजंता यादव झुंज देतील का !

कृष्ण जोशी
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

या मतदारसंघात उत्तर भारतीय मते एवढी प्रभावी आहेत की मागील वेळी मराठी माणसाचा आवाज म्हणवल्या जाणाऱ्या मनसेने देखील उत्तर भारतीय उमेदवार दिला होता.

मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे वजनदार नेते अतुल भातखळकर यांची लढत काँग्रेसच्या नगरसेविका अजंता यादव यांच्याशी होत आहे.

या मतदारसंघातील कागदावरचे गणित पाहिले तर येथे भाजपची अवस्था पुष्कळच चांगली आहे. मात्र भाजपच्या भातखळकर यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर भारतीय कार्ड खेळून लढतीत थोडीशी रंगत आणली आहे. मात्र भातखळकर आणि भाजपच्या धुरिणांनी देखील प्रत्युत्तरादाखल असेच उत्तर भारतीय कार्ड खेळून काँग्रेसचा डाव हाणून पाडल्यातच जमा आहे.

या मतदारसंघात उत्तर भारतीय मते एवढी प्रभावी आहेत की मागील वेळी मराठी माणसाचा आवाज म्हणवल्या जाणाऱ्या मनसेने देखील उत्तर भारतीय उमेदवार दिला होता. तेव्हा येथील १५ पैकी १० उमेदवार उत्तर भारतीय होते.

अर्थात काँग्रेस व मनसे उमेदवार वगळता त्यांना फारशी मते मिळाली नाहीत ही गोष्ट वेगळी. मागील निवडणुकीच्या वेळी येथे भातखळकर आणि काँग्रेसचे प्रमुख नेते रमेशसिंह ठाकूर यांच्यात लढत झाली होती. त्यात भातखळकर विजयी झाले होते. 

या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमध्ये उत्तर भारतीय वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मागील वेळी ठाकूर यांना ती मते मिळाली होती. आता ठाकूर हे भाजपमध्ये आले असून ते मालाड मतदार संघात काँग्रेसच्या असलम शेख यांच्याशी लढत देत आहेत. त्यामुळे आता येथील उत्तर भारतीय मते भातखळकर यांनाच मिळण्याची शक्यता आहे. 

मागील वेळी येथे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकारी समितीचे नेते गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल यांनी भातखळकर यांना अपयशी लढत दिली होती. आता युती असल्यामुळे शिवसेनेची ही मतेदेखील भातखळकर यांनाच मिळतील. मोदी शहा यांच्यामुळे गुजराती-मारवाडी-जैन मते देखील भाजपच्याच पारड्यात पडतील. तरीही भातखळकर यांनी अत्यंत सावधपणे पावले टाकीत कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवले आहे. 

त्यामुळे भाजपच्या धुरिणांनी येथील उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा आयोजित केली. त्यांच्या सभेला पुष्कळ गर्दी होती व त्यांच्या तडाखेबंद भाषणामुळे येथील उत्तर भारतीय मतदार चांगलेच प्रभावित झाले. या खेळीमुळे काँग्रेसचे उत्तर भारतीय कार्ड निष्फळ ठरेल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.

अजंता यादव येथील लोकप्रिय नगरसेविका असून त्यांनी महिलांसाठी तसेच झोपडीवासीयांसाठी काही कामे केली आहे. अर्थात त्यांचा प्रभाव त्यांच्या प्रभागापुरता मर्यादित आहे. उत्तर भारतीय मतदारांमध्ये देखील त्या लोकप्रिय आहेत. 

तर दुसरीकडे भातखळकर हेदेखील आपण पाच वर्षे केलेल्या कामांचे दाखले मतदारांना देत आहे. महिलांसाठी बचत गटांना केलेली मदत व त्या मार्फत महिलांना दिलेले रोजगार, मुलांसाठी स्थापन केलेल्या बालवाड्या-वाचनालये, तरुणांसाठी व्यायामशाळा, ज्येष्ठांसाठी उद्याने यांची निर्मिती भातखळकर यांनी केली आहे. याचबरोबर भातखळकर यांनी परिसरातील रस्ता रुंदीकरण, सौरदिवे अशी कित्येक कामे केली आहेत. 

त्यामुळे कामे तसेच विविध समाज गटांमधील लोकप्रियता या दोन्ही बाबतीत आता भाजपचे पारडे जड ठरले आहे. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असे स्वरूप या लढतीला आले असते तर त्यात थोडीशी रंगत आली असती. मात्र काँग्रेसचे उत्तर भारतीय कार्ड भाजपने निष्प्रभ केल्यामुळे आता पारडे पुन्हा भाजपच्या बाजूने झुकले आहे. 

मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वलय देखील त्यांना लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या लढतीत मनसे, आप, बसपा, वंचित बहुजन आघाडी यांचेही उमेदवार आहेत, मात्र त्यांचा फारसा परिणाम भातळखकर यांच्या मतांवर होईल अशी परिस्थिती नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख