त्यांच्याकडे 29, तर माझ्याकडे 30 पुरावे : साई जन्मभूमी वाद

saibaba birth place row
saibaba birth place row

शिर्डी : "मराठवाड्यातील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे पाथरी साई जन्मभूमी असल्याचे 29 पुरावे असतील, तर मी पाथरी साई जन्मभूमी नाही, हे सिद्ध करणारे 30 पुरावे गोळा केले आहेत,'' असा दावा शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी आज "सकाळ'शी बोलताना केला.

मराठवाड्यातील पाथरी हे गाव साईबाबांची जन्मभूमी आहे की नाही याबाबत साई संस्थानाने कोणतीही जाहीर भूमिका घेतलेली नाही. तथापि कुठलाही वाद निर्माण झाला, की साईचरित्र हा ग्रंथ साई संस्थान प्रमाण मानते. त्यात जन्मभूमीचा उल्लेख नाही. तथापि साईबाबांच्या जीवनावर संशोधन करणारा विभाग येथे कार्यरत नाही. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या वादात पुरावे संकलनाची जबाबदारी कोते यांनी शिरावर घेतली आहे. हे पुरावे ते येत्या रविवारी जाहीर करणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचे दावे तपासून निर्णय घेण्याची वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.

साईसमाधी शताब्दीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डीत म्हटले होते, ""काही लोकांना पाथरी हे साईंचे जन्मस्थान आहे असे वाटते. पाथरीच्या विकासासाठी निधी मिळायला हवा.'' त्या वेळीदेखील शिर्डीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर कोते यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुढाकारातून राष्ट्रपतींच्या भेटीसाठी बावीस ग्रामस्थांचे शिष्टमंडळ नेले. त्यांच्यासमोर पाथरी हे साईंचे जन्मस्थान नाही, याबाबतचे पुरावे ठेवले. त्यानंतर राष्ट्रपतींनी, "पाथरीबाबतचे विधान आपले नव्हे, तर काही लोकांचे मत होते,' असे म्हटले होते.

आमच्या या भेटीनंतर राष्ट्रपतींनी पाथरीचा नियोजित दौराही रद्द केला, असा दावा कोते यांनी केला.
या भेटीत कोते यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर पाथरी हे साईंचे जन्मस्थान नाही, याबाबतचे 30 पुरावे ठेवले होते. आता हेच पुरावे ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे पंधरा दिवसांत शिर्डीकरांची बाजू ऐकण्यासाठी वेळ देतील. राष्ट्रपतींना आमची भूमिका पटली होती. आता मुख्यमंत्र्यांनाही पटेल. माझ्याकडे सर्व पुरावे भक्कम आहेत. पाथरीसारखे दहा ठिकाणी साई जन्मभूमीचे दावे केले जातात. या उर्वरित दावेदारांचे काय करायचे, असा प्रश्‍न मात्र निर्माण होईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com