सर्व काही ठीक होईल, मी पैशाचे बघतो तु फक्त पोराकडे बघ, त्यावेळी साहेबांनीच दिला होता दिलासा...

कागदपत्रे पाठवल्याचा दुसऱ्याच दिवशी माझ्या ढवळेश्वर गावच्या पत्त्यावर पत्र आलेलं. मला त्यांनी तात्काळ दोन लाख मदत दिली होती. मला घराकडून निरोप आला,' मला पटल नाही. कारण दिल्लीवरून एका दिवसात कस पत्र येईल.? अस वाटलं. पण दुसऱ्या दिवशी गावाकडून एकजण ते पत्र घेऊन दवाखान्यात आले. ते पत्र पाहून मी भावनिक झालो.
 सर्व काही ठीक होईल, मी पैशाचे बघतो तु फक्त पोराकडे बघ, त्यावेळी साहेबांनीच दिला होता दिलासा...

पुणे : " जितेंद्र सर्व ठीक होईल. तू फक्त पोरावर लक्ष दे. पैशाची व्यवस्था मी करतो. साहेब जसे बोलले तसं वागले. मी पोराची काळजी घेतली आणि साहेबांनी पोराच्या उपचारासाठी लागेल तेवढी रक्कम मला दिली. साहेबांसारखा देवमाणूस जगात नाही. अशी भावना सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर गावचे जितेंद्र केशव कांबळे यांनी "सरकारनामा' शी बोलताना व्यक्त केल्या. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने जितेंद्र कांबळे यांनी पवार यांच्याबद्दल आलेल्या अनुभवाला उजाळा दिला. त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नसताना किंवा कुठलीही ओळख नसताना फक्त एका फोनवर साहेबांनी त्यांना मदत केली त्यामुळे साहेबांबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना ते गहिवरले होते. 
ते म्हणाले, " माझ्या एकुलत्या मुलाला ब्लडकॅन्सर झाल्याच निदान झालं आणि मी सैरभैर झालो. हादरून गेलो. काहीही कळत नव्हतं. डॉक्‍टरांनी उपचारासाठी जी रक्कम सांगितली होती. ती उभी करणं मला शक्‍य नव्हतं. ती रक्कम उभी करता आली नाही तर पोरग वाचणार नव्हतं. मी रोज रडत होतो. लोकांना माझी वेदना सांगत होतो. मार्ग सापडत नव्हता. एक दिवस मला एका नेत्याकडून शरद पवार यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. मी ठरवलं फोन करून साहेबाना सगळं सांगायच. पण फोन उचलला जाईल का? मनात शंका होती. एस टी डी त गेलो. नंबर डायल केला.दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला.' 
बोला... तो साहेबांचा आवाज होता. फोन उचलला गेला होता. मग मी साहेबाना भडाभडा सगळं सांगत राहिलो. साहेब ऐकत होते. माझं बोलणं संपल्यावर ते म्हणाले." हॉस्पिटलची सगळे पेपर मला फॅक्‍स करा.' त्यांनी जो नंबर दिला होता. त्यावर दुसऱ्या दिवशी मी कागदपत्रे पाठवली. कागदपत्रे पाठवल्याचा दुसऱ्याच दिवशी माझ्या ढवळेश्वर गावच्या पत्त्यावर पत्र आलेलं. मला त्यांनी तात्काळ दोन लाख मदत दिली होती. मला घराकडून निरोप आला,' मला पटल नाही. कारण दिल्लीवरून एका दिवसात कस पत्र येईल.? अस वाटलं. पण दुसऱ्या दिवशी गावाकडून एकजण ते पत्र घेऊन दवाखान्यात आले. ते पत्र पाहून मी भावनिक झालो. मी साहेबाना फोन केला. आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, " जितेंद्र तू फक्त पोराकडे लक्ष दे. पैशाची व्यवस्था मी करतो. याचदरम्यान साहेबांनी अनेक ट्रस्टना मदतीसाठी पत्र पाठवली होती. मला त्यांनी पाहिलेलं नव्हतं. मी कोणत्या पक्षाचा होतो. याची कसलीही माहिती नसताना हा माणूस माझ्यासाठी पत्रव्यवहार करत होता. माझ्या संकटात माझ्या पाठीशी उभा राहिला होता. जे काही घडत होतं ते स्वप्नात घडत असल्यासारख होतं. माझ्या मुलाला डिस्चार्ज मिळेपर्यंत साहेब लक्ष ठेवून होते. मी साहेबांना आयुष्यात कधीही भेटलो नव्हतो तरी ते जुनी ओळख असल्यासारखे मला वागवत होते. मला सतत आधार देत होते, सावरत होते असे कांबळे म्हणाले. 
" दुर्दैवाने माझा मुलगा वाचला नाही. त्याच्या निधनानंतर मी साहेबांना फोन केला. तेही खूप दुःखी झाले. मला म्हणाले, " स्वतःला सावरा.कुटूंबाची काळजी घ्या. काहीही प्रसंग आला तरी कळवा. मी सोबत आहे' असे कांबळे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com