पवार साहेब, आता तरी भाकरी फिरवा : कामठे यांचे साकडे

पवार साहेब, आता तरी भाकरी फिरवा : कामठे यांचे साकडे

पुणे : साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच तेच इच्छुक आहेत. पुन्हा पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळणार असेल तर नव्यांना कधीच संधी मिळणार नाही, असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. यासाठी, आता तरी भाकरी फिरवा, असं साकडं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्यांना संधी देण्यासाठी "एक व्यक्ती एक पद' या सूत्र वापरले पाहिजे. यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ, सहकारी साखर कारखाने यासारख्या सहकारी संस्थांवर पदाधिकारी किंवा संचालक असलेल्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणीही कामठे यांनी पवार यांच्याकडे केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती नुकत्याच पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात घेण्यात आल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रवक्‍त्या विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या मुलाखती घेतल्या. बारामती व आंबेगाव मतदारसंघातून विद्यमान आमदारांशिवाय अन्य कोणीही इच्छुक नसल्याने या दोन्ही मतदारसंघातील मुुलाखती घेण्यात आल्या
नाहीत.

मात्र उर्वरित आठ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र या मुलाखतीसाठी सर्वच मतदारसंघातून पुन्हा पुन्हा जुनेच चेहऱ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आल्याचेही कामठे यांनी पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कामठे म्हणाले, ""जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी दिली जात असल्याने, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह निर्माण झाला आहे. आपल्याला कोठेच संधी मिळणार नसेल तर, आपण काय आयुष्यावर सतरंज्याच उचलत बसायच्या का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यातूनच राष्ट्रवादीतून अन्य पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.''

पुरंदर मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच हवा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. या आघाडीच्या जागावाटपात बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस आग्रही राहील, असे दिसते आहे. मात्र हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ठेवा, अशी मागणीही कामठे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com