Kamalnath swings into action declares loan waiver to farmers | Sarkarnama

कमलनाथांचा झपाटा :शपथविधीनंतर दोन तासात शेतकऱ्यांना कर्जमाफी

सरकारनामा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

.

भोपाळ :  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपला शपथविधी उरकल्यानंतर अवघ्या दोन तासात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून आपल्या कामाचा झपाटा दाखवून दिला आहे.

कॉंग्रेस पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मध्य प्रदेशामध्ये भाजप आणि शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष होता. गेल्यावर्षी शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार हा निर्णायक क्षण मानला जातो. तेंव्हापासून राज्याचे राजकारण भाजपच्या विरोधात फिरले असे मानले जाते.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तीन महिन्यांवर आलेली असताना कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करून दाखविण्याचे आव्हान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासमोर असणार आहे.

टाईम मॅनेजमेंट आणि शिस्तीबद्दल प्रसिद्ध असलेल्या कमलनाथ यांनी घडाळ्यावर बोट ठेवून काम सुरू केले आहे असे मानले जाते. या घोषणेतून त्यांनी राज्यातील नोकरशाहीला गतीमान प्रशासनाचा संदेश दिला आहे.

सकाळी 11 वाजता कमलनाथ यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू, द्रमुकचे एम. के. स्टालिन आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुला हजर होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख