Kamal Nath's Nagpur connection; runs college in the city | Sarkarnama

कमलनाथ यांचे नागपूर कनेक्‍शन 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 16 डिसेंबर 2018

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले कमलनाथ यांचे नागपूरशी जवळचे संबंध असून ते गेल्या 14 वर्षांपासून नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नॉलॉजी (आयएमटी) संचालित करीत आहेत. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात या महाविद्यालयाचा पहिल्या 20 महाविद्यालयांमध्ये समावेश होतो.

नागपूर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले कमलनाथ यांचे नागपूरशी जवळचे संबंध असून ते गेल्या 14 वर्षांपासून नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नॉलॉजी (आयएमटी) संचालित करीत आहेत. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात या महाविद्यालयाचा पहिल्या 20 महाविद्यालयांमध्ये समावेश होतो.
 
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ सोमवारला (ता. 17) शपथग्रहण करणार आहेत. तब्बल 15 वर्षांनी मध्यप्रदेशात कॉंग्रेसची विजयी पताका फडकविण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कमलनाथ यांची प्रमुख भूमिका राहिली आहे.

मध्यप्रदेशची धुरा सांभाळणारे कमलनाथ यांचा नागपूरशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहे. त्यांचा छिंदवाडा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याला लागून आहे. या मतदारसंघातील अनेक भागात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत. कमलनाथ यांच्या प्रत्येक निवडणुकीत या भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी नागपुरातील अनेक नेत्यांना ते प्रत्येक वेळी बोलावितात. आमदार सुनील केदार (सावनेर जि. नागपूर) यांच्याकडे या भागातील प्रचाराची जबाबदारी राहते. 

याशिवाय राज्यातील नेतेही छिंदवाडा येथे आवर्जुन जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह विदर्भातील बहुतेक नेत्यांनी कमलनाथ यांच्या मतदारसंघात प्रचार केला आहे.

कमलनाथ यांच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सुनील केदार भोपाळला रवाना झाले आहेत. कमलनाथ यांचे केवळ राजकीय संबंध नाही तर त्यांचे उत्कृष्ट महाविद्यालयापैकी एक असलेले आयएमटी नागपुरात आहे. 

कळमेश्‍वर रस्त्यांवर अंत्यत प्रशस्त असलेले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नॉलॉजी आहे. व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रात आयएमटीचा देशातील पहिल्या 20 महाविद्यालयांमध्ये समावेश होतो. या महाविद्यालयाच्या निमित्ताने कमलनाथ नेहमीच नागपुरात येतात.

नागपुरातील कॉंग्रेसच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते ओळखतात. यात अतुल कोटेचा, नीरज चौबे यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपुरातील अनेकजण कमलनाथ यांच्यासोबतचे छायाचित्रे सोशल मिडीयामध्ये शेअर करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख