Kamal Nath moved forward in Digvijay - Jyotiraditya's fight | Sarkarnama

दिग्विजय - ज्योतिरादित्याच्या संघर्षात कमलनाथांनी मारली मुख्यमंत्री पदाची बाजी 

सरकारनामा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

कमलनाथ यांचा राजकीय प्रवास दिसतो तेवढा सोपा नाही. एका मुत्सद्दी आणि धुरंधर आणि सबुरीने चालणाऱ्या नेत्याच्या निष्ठेची पक्षाने वयाची सत्तरी पार केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने दिलेली ही पावती आहे.

दिल्ली :  मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात कॉंग्रेस पक्षाचा सर्वाधिक गर्दी खेचणारा चेहरा होता ज्योतिरादित्य शिंदे यांचा, पण मुख्यमंत्रिपदाची माळ पडली ती धुरंधर राजकारणी कमलनाथ यांच्या गळ्यात! 

कमलनाथ यांचा अनुभव, परिपक्वता आणि पक्षासाठी निधी उभा करण्याचे कौशल्य महत्त्वाचे ठरले. मात्र निर्णायक ठरली ती कमलनाथ यांची गांधी घराण्याच्या चार पिढ्यांशी गेल्या चाळीस वर्षांची असलेली निष्ठा !

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील प्रदीर्घ राजकीय वैमनस्यातून कमलनाथ यांचा मार्ग मोकळा होत गेला. आधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर थेट मुख्यमंत्री अशी मजल त्यांनी मारली. 

दिग्विजय सिंह यांनी आपली डाळ शिजत नाही हे ध्यानात आल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून कमलनाथ यांच्या पाठीशी आपले संपूर्ण बळ उभे केलेले होते. दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्विजयसिंगांनी राज्यभर असलेले आपले नेटवर्क आणि खडानखडा  माहिती कमलनाथाना दिली . 
 

इंदिरांजींचा तिसरा मुलगा
आज 47 वर्षांचे असलेल्या  ज्योतिरादित्य शिंदे यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा कमलनाथ संजय गांधी यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय झालेले होते. कमलनाथ यांची संजय गांधींशी मैत्री डून स्कूल पासूनची. 1977 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई आणि त्यांचे मंत्री गांधी घराण्याच्या मागे हात धुऊन लागलेले असताना भलेभले नेते इंदिराजींना सोडून गेले. 1977 ते 1980 या अत्यंत प्रतिकूल अशा काळात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याबरोबर जे मोजके लोक होते त्यात कमलनाथ यांचा समावेश होता.

मारुती कार घोटाळ्यात संजय गांधींना अटक झाल्यावर त्याच दिवशी न्यायमुर्तींशी हुज्जत घालून कमलनाथ यांनी आपल्याला अटक होईल याची व्यवस्था केली. त्यानंतर संजय गांधींच्या बरोबरच तुरुंगात राहून त्यांची सेवा करण्याची संधी कमलनाथ यांनी साधली होती.

त्यामुळे 1980 मध्ये कॉंग्रेसपक्षाने कमलनाथ यांना लोकसभेचे तिकीट दिले. छिंदवाड्यात त्यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, "कमलनाथ हा माझा तिसरा मुलगा आहे, त्याला निवडून आणा.''

संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर डून स्कूलचा समान धागा पकडून इंदिरांजींच्या शब्दांमुळे कमलनाथ पाहता पाहता राजीव गांधी यांच्याही जवळ गेले. राजीव गांधी यांच्याबद्दल बोफोर्सवरून व्ही. पी. सिंग यांनी वादळ निर्माण केले तेव्हा राजीव गांधींच्या जवळच्या सल्लागारात कमलनाथ दाखल झालेले होते.

विद्याचरण शुक्‍ला, श्‍यामचरण शुक्‍ला, अर्जुन सिंह, मोतीलाल व्होरा, सुंदरलाल पटवा, माधवराव शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यासारखे रथीमहारथी मध्यप्रदेश कॉंग्रेसचे राजकारण दणाणून सोडत असताना कमलनाथ दिल्लीमध्ये खासदार म्हणून काम करीत होते. 

या रथीमहारथींचा जवळून अभ्यास करीत होते. आर. के. धवन, माखनलाल फोतेदार, सीताराम केसरी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडून दरबारी राजकारणाचे धडे घेत होते. केंद्रीय मंत्रिमंडळात उद्योग, व्यापार, वने-पर्यावरण, रस्ते वाहतूक, नगरविकास अशा विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले.

कमलनाथ आणि वाद
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये 1984 मध्ये शीख विरोधी दंगे झाले होते. त्यामध्ये रकाबगंज गुरुद्वारासमोर झालेल्या हिंसाचारास कमलनाथ यांनी स्वतः हजर राहून चिथावणी दिल्याचे आरोप झाले होते. नानावटी कमिशन समोर त्यांना हजरही राहावे लागले होते.

त्यांनी हिंसाचार घडला तेव्हा आपण पक्षाच्या आदेशानुसार शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेलो होतो असा बचाव केला. पण शीख समाजाला आणि अकाली दलाला त्यांचा हा दावा कधीच मान्य झाला नाही. म्हणून ते आताही त्यांच्या नियुक्तीला विरोध करीत आहेत.

1996 मध्ये हवाला घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी न देता त्यांच्या पत्नी अलका देवींना उमेदवारी दिली. त्या निवडून आल्या. पुढे वर्षभराने कमलनाथ हवाला घोटाळ्यातून मुक्त झाले. त्यांच्यासाठी अलका देवींनी राजीनामा दिला. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत सुंदरलाल पटवा यांनी त्यांना पराभूत केले. 1980 पासून आतापर्यंत नऊ वेळा खासदार राहिलेल्या कमलनाथ यांचा हा एकमेव पराभव होता. त्याचे उट्टे त्यांनी 1999 च्या निवडणुकीत काढले.
 

उद्योजक आणि फंड रेझर 
कमलनाथ हे सहसा कटू आणि वादग्रस्त  बोलणे टाळतात. आपली नाराजी बोलून व्यक्त करण्यापेक्षा समोरच्याला तडाखा देऊन ते व्यक्त करतात. यांचे घर असो की कार्यालय कार्यकर्त्यांसाठी खुले असते. सुखादुखाला धावून जातात आणि गरजूंना आर्थिक मदतही करतात. त्यांची कार्यपद्धती शिस्तीवर आणि वेळ पाळण्यावर भर देणारी आहे. दिलेला शब्द ते पाळण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
 

रिअल इस्टेट, प्लॅन्टेशन, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण अशा विविध क्षेत्रात कमलनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 23 कंपन्या आहेत. या कंपन्यांचा कारभार त्यांची मुले बकुलनाथ आणि नकुलनाथ हे पाहतात. 2011 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत मंत्री म्हणून 273 कोटींची मालमत्ता असलेले कमलनाथ यांचे नाव पुढे आले होते. 

असे असले तरी कमलनाथ अतिशय लो-प्रोफाइल राहणे पसंत करतात. त्यांचे देशात आणि राज्यातील उद्योगपतींशी चांगले संबंध आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या वेळी कमलनाथ यांनी कॉंग्रेस पक्षासाठी मोठा निधी उभा केला होता. निवडणूक प्रचार खर्चातही त्यांनी भाजपपेक्षा कॉंग्रेस सरस असल्याचे दाखवून दिले.

सॉफ्ट हिंदुत्व 
भाजपच्या हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्वाने उत्तर देणाऱ्या कमलनाथ यांनी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक गो-शाळा बांधण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. आपल्या छिंदवाडा मतदारसंघात 108 फूट उंचीची महाबली हनुमानाची मूर्ती त्यांनी उभारलेली आहे. शिवाय भाजपला काऊंटर करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा थेट वाराणशीहून साधूसंतांना आपल्या मतदारसंघात आणलेले आहे.

अंतर्गत कलहाने गेली पंधरा वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाला मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्यासारख्या दरबारी राजकारणी देण्याशिवाय पर्याय नव्हता. कॉंग्रेस हायकंमाडने आगामी लोकसभा निवडणुकांवर नजर ठेवीत त्यांच्या अनुभवाला पसंती दिलेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख