कल्याण ग्रामीण: शिवसेनेतील मतभेदांचा लाभ मनसेच्या पाटलांना होणार का ?

शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला असला तरी कल्याण ग्रामीण मतदारसंघात मात्र वेगळे चित्र दिसून आले.
Patil Mhatre
Patil Mhatre

ठाणे :  शिवसेनेने  सुभाष भोईर यांचा पत्ता आयत्या वेळी कट करुन रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भोईर आणि म्हात्रे गटातील वाद ऐन निवडणुकीत विकोपाला गेला . राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठीमाबा असलेली राजू पाटील यांना शिवसेनेतील गटबाजीचा किती लाभ उठवता आला यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत .  

शहरातील समस्या सोडविण्यात राजकीय प्रतिनिधी असमर्थ ठरले असून त्यांच्याविषयी मतदारांच्या मनात रोष असल्याचे चित्र मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट झाले. शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला असला तरी कल्याण ग्रामीण मतदारसंघात मात्र वेगळे चित्र दिसून आले.

 मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा अवघा एक टक्का ग्रामीण मतदारसंघात घटला आहे. मागीलवर्षी 44 हजार मतांच्या फरकाने सेनेच्या उमेदवाराचा विजय झाला होता. यंदा मात्र या मतदारसंघाच चित्र वेगळे असून सेना भाजपाची युती झाली आहे, परंतू राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा जाहीर केला असल्याने सोमवारी झालेल्या एकूण मतदानाच्या 46 टक्क्यांच्या मतांची विभागणी कशी झाली असेल ? अंतिम निकाला अंती आपल्या पारड्यात किती मते पडतील या समीकरणाची जुळवाजुळव राजकीय वर्तुळात सुरु असल्याचे मंगळवारी दिसून आले.

सोमवारी मतदान प्रक्रीया पर पडली असून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 46.10 टक्के मतदान झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीला या मतदारसंघात 47.96 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावर्षी मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाच्या टक्केवारीत एका टक्क्याने घट झाल्याचे दिसून आले. सर्वच राजकीय पक्ष 2014 ची विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढले असले तरी भाजपाचा येथे उमेदवार नसल्याने सेनेचा 44 हजार मतांच्या फरकाने विजय झाला होता.

यंदा सेना भाजपाची युती झाली असली तरी महायुतीने केलेल्या विकास कामांच्या केवळ घोषणा, मुलभूत सोयींचा अभाव, 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या पोकळ आश्वासन आदि विविध कारणांमुळे येथील मतदारसंघात युती विरोधात नाराजी आहे. त्यातच उमेदवारीचे तिकीट देताना सुभाष भोईर यांचा पत्ता आयत्यावेळी कट करुन सेनेने रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भोईर आणि म्हात्रे गटातील वाद उघड झाला.

 कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही मनसेला पाठींबा जाहीर केल्याने या सर्वांचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे. 2014 ला मनसेचे रमेश पाटील हे निवडणुक लढले होते, यंदा त्यांचे बंधू राजू पाटील हे आमदारकीसाठी उभे आहेत. नाराज भोईर गटाची मते मनसेकडे विभागली जावी यासाठी मनसेने पडद्याआडून जोरदार प्रयत्न केले. याला युतीतील एका गटानेही पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा आहे. युती व मनसेत खरी लढत असली तरी रिंगणात एकूण 12 उमेदवार असून ते उमेदवार किती मत घेतात यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे. यामुळे कोणाला किती मते विभागली जातील याचा आढावा दोन्ही गटात घेतला जात आहे.

2014 च्या निवडणुकीत सेनेचे सुभाष भोईर यांना 54 टक्के मते मिळाली होती, तर मनसेचे रमेश पाटील यांना 26 टक्के मते मिळाली होती. आघाडीने 19 टक्के मते मिळविली होती. 2014 ला 1 लाख 67 हजार 496 मतदारांनी मतदान केले होते. यावर्षी मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून 1 लाख 97 हजार 36 मतदारांनी आपले मत नोंदविले आहे. यातील नवमतदारांनी आपली मते कोणाच्या पारड्यात टाकली आहेत हे येत्या गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com