जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत शिवसेनेने शब्द पाळावा - कल्याण काळे

 जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत शिवसेनेने शब्द पाळावा - कल्याण काळे

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. शिवसेना-कॉंग्रेस आघाडीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे पहिली अडीच वर्ष अध्यक्षपद होते. आता 3 जानेवारी रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासह बांधकाम आणि आरोग्य सभापतीपद ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसला मिळावे अशी मागणी केली जात आहे. जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी या संदर्भात "आमचं ठरलंय' असे सांगत शिवसेनेने दिलेला शब्द पाळावा असे आवाहन केले आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने तत्कालीन कॉंग्रेस आमदार तथा जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्याशी हातमिळवणी केली होती. 17 सदस्य असलेल्या शिवसेनेच्या ऍड. देवयानी डोणगांवकर कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर अध्यक्ष झाल्या होत्या. तेव्हाच पुढील अडीच वर्ष कॉंग्रेसला अध्यक्षपदासह सध्या शिवसेनेकडे असेलेली जिल्हा परिषदेतील सगळी पद कॉंग्रेसकडे दिली जातील असे ठरले होते असा दावा कल्याण काळे यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर येत्या 3 जानेवारीला निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर लगेच आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांचा अध्यक्ष असे धोरण ठरवण्यात आले. त्यानूसार जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 17 तर कॉंग्रेसचे 16 सदस्य आहेत. नव्या धोरणानुसार पुन्हा शिवसेनेचाच अध्यक्ष होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु कॉंग्रेसने या चर्चेला पुर्णविराम देत आमचं आधीच ठरलंय अशी भूमिका घेतली आहे. 

शब्द न पाळल्यास अन्य पर्यायांचा विचार... 
कॉंग्रेसचे कल्याण काळे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आता सत्तेत आले आहे. पण शिवसेनेशी आमची बोलणी ही जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्याचवेळी झालेली असल्याचे म्हटले आहे. तत्कालीन कॉंग्रेस आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पुढील अडीच वर्ष कॉंग्रेसला अध्यक्षपदासह बांधकाम व आरोग्य सभापती देण्याचा शब्द शिवसेनेकडून घेतला होता. त्यामुळे शिवसेनेने आता आपला शब्द पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अद्याप स्थानिक पातळीवर या विषयी आमची शिवसेनेशी कुठलीही बोलणी झालेली नाही. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, किंवा शिवसेनेकडून देखील कुणी कॉंग्रेसशी बोलणी केलेली नाही. पण राज्य पातळीवर या संदर्भात चर्चा सुरू आहे, आणि ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसला अध्यक्षपद व शिवसेनेकडे असलेली अन्य पदे मिळतील असा विश्‍वास मला आहे. शिवसेनेने शब्द पाळावा, अन्यथा आम्हाला वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल असा इशाराही कल्याण काळे द्यायला विसरले नाहीत. 
सत्तार समर्थक सदस्य आमचेच... 
शिवसेनेचे संख्याबळ कॉंग्रेसपेक्षा केवळ एकने जास्त आहे. अब्दुल सत्तार हे जरी आता शिवसेनेत असले तरी त्यांचे समर्थक सदस्य हे आमचेच म्हणजे कॉंग्रेसचेच आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जिल्हा परिषद निवडणुकीत बजावलेला व्हीप त्यांनाही बंधनकारक असणार आहे. पक्षविरोधी भूमिका त्यांनी घेतली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. पण ती वेळ येणार नाही, कॉंग्रेसचे सगळे सदस्य आमच्या सोबतच असल्याचा दावा देखील काळे यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com