कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीचे वारे!  - Kalyan-Dombivali - BJP-Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीचे वारे! 

मयुरी चव्हाण-काकडे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र नांदत असले, तरी त्यांच्यात वारंवार खटके उडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. शहरातील विकासकामे असोत वा रेल्वेच्या नवीन सुविधा; पोस्टर वॉर आणि सोशल मीडीयावरही या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असते; मात्र सध्या विविध महोत्सव, बैठकांच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीचे वारे वाहू लागल्याचे दिसत आहे.
 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र नांदत असले, तरी त्यांच्यात वारंवार खटके उडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. शहरातील विकासकामे असोत वा रेल्वेच्या नवीन सुविधा; पोस्टर वॉर आणि सोशल मीडीयावरही या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असते; मात्र सध्या विविध महोत्सव, बैठकांच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीचे वारे वाहू लागल्याचे दिसत आहे.
 
शहरात सध्या वनराई महोत्सव सुरू असून याचे प्रमुख प्रायोजक शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे असून सहप्रायोजक भाजपचे नगरसेवक महेश पाटील आहेत. या महोत्सवाच्या बॅनरवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार आदी भाजपच्या नेत्यांच्या छायाचित्रांनाही स्थान देण्यात आले आहे. यावरून शिवसेना-भाजपमध्ये हळूहळू मैत्रीचे बंध जुळू लागल्याचे दिसत आहे. 

डोंबिवली पश्‍चिमेला नागूबाई सदन इमारत खचल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने येथील कुटुंबांचे बीएसयूपीच्या घरात पुनर्वसन झाले. याबाबत भाजपचे शैलेश धात्रक यांनी शहरात लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानत त्यांना पोस्टरवर बरोबरीचे स्थान दिले आहे. 

दुसरीकडे मंत्रिमंडळाने मेट्रो मार्ग क्रमांक 5 ला मान्यता दिल्याबद्दत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे खासदार कपिल पाटील यांनाही मेट्रोच्या कामाचे श्रेय देत मित्रपक्षाबद्दल दिलदार वृत्ती दाखवली. 

मैत्री, की जुळवून घेण्याचा प्रयत्न? 
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले असून मनसेला रोखण्यासाठीच शिवसेना-भाजप एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? असा प्रश्‍नही यानिमित्ताने निर्माण झाला असून याबाबत शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या मैत्रीवर सध्या चुप्पी साधणे पसंत केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख