फुलंब्रीमध्ये अनुभवी बागडे विरुध्द काळे यांच्यातच सामना रंगणार

 फुलंब्रीमध्ये अनुभवी बागडे विरुध्द काळे यांच्यातच सामना रंगणार

औरंगाबाद : वाढते वय हा निकष उमेदवारी देतांना विचारात घेतला जाणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे तिकीट यावेळी कापणार अशा चर्चांना फुलंब्री मतदारसंघात उधाण आले होते. मात्र बागडे यांच्या वाढत्या वयाप्रमाणेच राजकारणातील दांडगा अनुभवच त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात कामी आला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपने बागडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता फुलंब्रीत हरिभाऊ बागडे विरुध्द कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे अशी परंपरागत लढत पहायला मिळणार आहे. 

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देतांना भाजपकडून वाढते वय आणि वाईट कामगिरी हे निकष लावण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. पैकी वाढते वय हा निकष लागू होऊन फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघात पेरण्यात आली होती. बागडे मात्र पुढचे आमदार आपणच असणार आहोत, उमेदवारी देखील मलाच मिळेल असे सांगत होते. 

आमदार होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या आणि गेली पाच वर्ष बागडे यांच्या सोबत वावरणाऱ्या अनेकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. जि.प.सदस्य अनुराधा चव्हाण, उपमहापौर विजय औताडे, प्रदीप पाटील, नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी इच्छूक म्हणून पक्षाकडे मुलाखती देखील दिल्या होत्या. बागडे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे आता या इच्छूकांना आणखी पाच वर्ष वाट पहावी लागणार आहे. 
बागडे- काळे लढतीकडे लक्ष 
आधीच्या पूर्व विधानसभा आणि 2009 मध्ये फुलंब्री स्वतंत्र मतदारसंघ झाल्यापासून हरिभाऊ बागडे आणि कॉंग्रेसचे कल्याण काळे यांच्यात तीनवेळा लढत झाली. पैकी 2004 मध्ये पूर्व मतदारसंघातून काळे यांनी भाजपच्या बागडेंचा 9110 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2009 मध्ये फुलंब्री मतदारसंघात बागडे-काळे पुन्हा आमने-सामने आले होते. तेव्हा बागडेंचा अवघ्या 2587 मतांनी पराभव झाला होता. 

दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 2014 ची मोदी लाट आणि कल्याण काळे यांच्या विरोधातील नाराजीचा फायदा उचलत बागडे यांनी फुलंब्रीत 3611 मतांनी विजय मिळवला होता. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांना थेट विधानसभा अध्यक्षपद देत त्यांचा पक्षाकडून सन्मान करण्यात आला होता. मराठवाडा आणि औरंगाबादसाठी देखील ही भूषणावह गोष्ट होती. 

राज्यातील सत्ता आणि विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे या पदाचा मान राखत मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात बागडे नानांच्या फुलंब्रीसाठी दोन्ही हातांनी निधी दिला. आतापर्यंत सर्वाधिक विकासनिधी आणि कामे केल्याचा दावा हाच बागडे यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा असणार आहे. पाच वर्षात झालेल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विक्रमी यश मिळाले. या जोरावर बागडे यावेळीही विजय आपलाच होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. 

तिकडे कॉंग्रेसने माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी देखील कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, हमीभाव, वाढती बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, दुष्काळ या मुद्यावरून मतदारसंघातील वातावरण तापवले आहे. संघर्ष यात्रा, यल्गार यात्रेच्या माध्यमातून काळे यांनी गेल्या वर्षभरात मतदारसंघात भाजप विरोधात रान उठवले होते. आता मतदार बागडे यांच्या विकासाला पावती देतात? की मग काळे यांनी मांडलेले मुद्दे मान्य करतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com