kahal politics | Sarkarnama

"म्हाडा'मुळे कागलच्या राजे गटाला उभारी 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 11 एप्रिल 2017


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कागल विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार म्हणूनही समरजितसिंह हे रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. "शाहू-कागल' चे कार्यक्षेत्र हे कागल व करवीर तालुक्‍यात आहे. कोल्हापूर-दक्षिणमध्ये निर्णायक भूमिकेत हा गट आहे. त्यामुळे दोन विधानसभा मतदार संघात त्यांचा प्रभाव पडणार आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास विधानसभा लढविण्याची तयारी त्यांनीही यापूर्वीच दर्शवली आहे. कागलमध्ये भाजपसाठी प्रबळ उमेदवार कोण नाही, अशा परिस्थितीत समरजित हे विधानसभेचे उमेदवार होऊ शकतात. 

कोल्हापूर : कागलच्या शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मिळालेल्या पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदामुळे तालुक्‍यातील राजे गटाला उभारी मिळणार आहे. गेल्या तीन दशकांपासून वंचित असलेल्या राजे गटाचे प्रमुख समरजितसिंह यांना हे पद मिळाल्याने तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा दबदबा वाढला आहे. 

सन 1985 व 1998 मधील "शाहू-कागल'चे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांचा पराभव वगळता प्रत्यक्ष राजकारणात या गटाचे अस्तित्व हे कोणाला तरी पाठिंबा देण्यापुरतेच होते. गेल्या 20 वर्षापासून तर निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की नगरपालिका, विधानसभा, लोकसभेची त्यात कोणाला तरी पाठिंबा देण्याशिवाय या गटाला पर्यायच राहिला नव्हता. पण त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी कोंडी होत होती. शासन दरबारी असलेल्या कार्यकर्त्यांच्या कामासाठी स्वतः कै. विक्रमसिंह घाटगे यांना प्रयत्न करावे लागते होते किंवा ज्यांना पाठिंबा दिला त्यांनाच विनंती करण्याची वेळ येत होती. कै. घाटगे यांची सत्ता असलेल्या संस्थांतील उत्कृष्ट कारभार
एवढीच या गटाची जमेची बाजू होती. सार्वजनिक कार्यात उतरायचे झाल्यास त्याला मर्यादा होत्या. 

दीड वर्षापूर्वी विक्रमसिंह घाटगे यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर राजे गटाची संपूर्ण जबाबदारी समरजितसिंह यांच्यावर येऊन पडली. केवळ कारखान्यापुरते कामकाज माहीत असलेले समरजितसिंह सार्वजनिक राजकारणात काय करणार ? याविषयी उत्सुकता होती. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांना "म्हाडा' चे अध्यक्ष पद देण्याचा शब्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला होता. सोमवारी अपेक्षेप्रमाणे श्री. घाटगे यांची या पदावर निवड झाली. यानिमित्ताने तीन दशकानंतर राजे गटाला एक सन्मानाचे पद मिळाले आहे. या पदाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य
माणसांची कामे करण्याची संधी त्यांना मिळणार आहेच शिवाय शासन दरबारीही या पदाचा वापर करून कार्यकर्त्यांची अडलेली कामेही मार्गी लावण्याची संधी त्यांना मिळाली आहे. तालुक्‍याच्या राजकारणात त्यांचा या पदामुळे दबदबा तर वाढलाच आहे पण जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचे महत्त्व या पदामुळे वाढले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख