ज्योतिरादित्य आणि अमोल कोल्हे यांच्या सभा मोदींच्या लॅडिंगमुळे रद्द

ज्योतिरादित्य आणि अमोल कोल्हे यांच्या सभा मोदींच्या लॅडिंगमुळे रद्द

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेचा फटका कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बसला. सोलापूर येथील विमानतळावरून विमानास टेकऑफ करण्यास परवानगी न दिल्यामुळे शिंदे यांची पुण्यातील सभा होऊ शकली नाही. असाच प्रकार डॉ. कोल्हे यांच्याबाबतही झाला. त्यामुळे या प्रकाराचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने निषेध केला.

कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे यांचा महाराष्ट्रात दौरा होता. सोलापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते रमेश बागवे आणि अरविंद शिंदे यांच्या प्रचारासाठी पुण्यात येणार होते. वानवडी येथे त्यांच्या सभेचे आयोजन केले होते. ही सभा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास होती. सोलापूर येथील कार्यक्रम संपवून सव्वापाचच्या सुमारास सोलापूर विमानतळावरून ते पुण्याकडे येणार होते.

त्याचवेळी पंतप्रधान सातारा येथील सभा संपवून पुण्यात येणार होते. त्यामुळे सोलापूर येथील टेकऑफला पोलिसांनी परवानगी दिली नाही. मोदी यांची पुण्यातील सभा संपवून ते दिल्लीकडे जाईपर्यंत पुणे विमानतळावर कोणत्याही विमानास उतरण्यास आणि टेकऑफ घेण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे शिंदे पुण्यात प्रचारासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना दोन तास सोलापूर विमानतळावर अडकून पडावे लागले.

दरम्यान, जळगाव येथे सभा घेऊन डॉ. कोल्हे पुण्याकडे निघाले होते. त्यांनाही परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनाही नियोजित कार्यक्रमाला पोचता आले नाही. कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडच्या तीन सभा गुरुवारी होऊ शकल्या नाहीत. इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवणे वा नाकारणे हे लोकशाहीची तत्वे व मूल्यांना कितपत धरून आहे,याविषयी संभ्रम निर्माण होतो आहे,अशी खंत खा. कोल्हे यांनी यानंतर व्यक्त केली.

शहरात भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघात सायंकाळी डॉ. कोल्हे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचार सभा होणार होत्या. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टर लॅन्डिंगला पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा असल्याने परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सिंदखेडराजा, बोदवड, एरंडोल व चोपडा येथील सभानंतर हेलीकॉप्टरने पुणे जिल्ह्यातील चार सभांसाठी डॉ.कोल्हे येऊच शकले नाहीत. जिल्ह्यात लप्रथम त्यांची सभा पाईट येथे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्यासाठी होणार होती. त्यानंतर भोसरीत राष्ट्रवादी पुरस्कृत विलास लांडे, नंतर पिंपरी व त्यानंतर शेवटी चिंचवडला दुसरे पुरस्कृत राहूल कलाटे यांच्यासाठी सभा होणार होती. मात्र, मोदींच्या पुण्यातील सभेमुळे हेलिकॉप्टर लॅन्डिंगला परवानगी नाकारताच सोशल मिडीयावरून खा. कोल्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com