ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा

ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा

उल्हासनगर : राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीने तातडीने हालचाल करत जिल्हाध्यक्षपदी हरकीरण (सोनिया) कौर धामी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.

ज्योती यांच्या सून पंचम कलानी या भाजपच्या महापौर; तर मुलगा ओमी कलानी यांच्या टिमचे नगरसेवक देखील भाजपकडून  निवडून आल्याने ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यात काल ज्योती कलानी यांनी वैयक्तिक अडचण सांगून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा तसेच सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र मुलगा ओमी आणि सून पंचम कलानी यांना साथ देण्यासाठी आणि हमखास निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सुन पंचमच्या प्रचारात उघड़पणे वेळ देता यावा याकरिता ज्योती कलानी यांनी राजीनाम्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यावर पप्पू कलानी हे पवार यांच्यासोबत सूर जुळले होते. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणि आमदार पप्पू कलानी होते. पण महापौर, आमदार, जिल्हाध्यक्ष,स्थायी समिति सभापती ही सर्व प्रमुख पदे घरात ठेवण्यात येत असल्याने 2007 च्या पालिका निवडणुकीत साई बलराम, जीवन इदनानी, विनोद ठाकूर, अंकुश म्हस्के, किशोर वनवारी, डॉ. महेश गावडे आदि कट्टर कलानी समर्थकांनी पप्पू कलानी यांच्यापासुन फारकत घेऊन गंगाजल फ्रंटची स्थापना केली होती. त्यामुळे कलानीवर सत्ता गमावण्याची नामुष्कि ओढावली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पप्पू कलानी यांचा भाजपाचे कुमार आयलानी यांनी पराभव केल्याने कलानी राजवट उल्हासनगरात संपुष्टात आली होती.

दरम्यान 2013 मध्ये पप्पू कलानी यांना इंदर बठिजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी राजकारणात लक्षवेधक एंट्री केली. त्यांनी त्यांची टीम ओमी कलानी(TOK)ची स्थापना केली. दोन पोटनिवडणुका जिंकल्यावर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ओमीने त्यांची आई ज्योती कलानी यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणले. विशेष पप्पू कलानी हे जेलमध्ये असतानाही शरद पवार हे उल्हासनगरात आले होते. मोदी लाटेत शरद पवार यांची सभा निर्णायक ठरली होती.

2017 च्या पालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी त्यांच्या `टीओकेला चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यास यश आले नाही. तेंव्हा राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असे अपेक्षित असताना ओमीने भाजपला प्राधान्य दिले. आज भाजपत जेवढे नगरसेवक आहेत त्यात सर्वाधिक संख्या ओमी यांच्या `टीओके`ची आहे.  या नगरसेवकांच्या लेटरपॅडवर कमळ आणि टीओके असे दोन्ही चिन्हे आहेत. इथुनच उल्हासनगरातून राष्ट्रवादी संपत असल्याचे संकेत मिळू लागले होते. आता ज्योती कलानी यांनी जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.

खासदारकीच्या निवडणुकीत बाबाजी पाटिल यांना 15 हजार मते मिळाली होती. ज्योती कलानी यांनी विधानसभा ही राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जागी गटनेते भारत गंगोत्री इच्छुक आहेत. मात्र गंगोत्री हे उल्हासनगर पूर्वेला अंबरनाथ विधानसभा मतदार क्षेत्रात राहत असल्याने त्यांना किती मतांचा प्रतिसाद मिळतो हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.
कलानी परिवाराचा कल पूर्णत: भाजपाकडे असून पंचम कलानी यांना उल्हासनगर विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्याकडे साकडे घालण्यात आलेले आहेत. मात्र माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे देखील दावेदार आहेत .युती झाली नाही आणि झाल्यावर ही जागा शिवसेनेच्या वाटयाला आल्यास दूसरा पर्याय म्हणून कलानी परिवार शिवसेनेकडे पंचम कलानी यांना तिकिट मिळावे याकरिता प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

मात्र शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, नगरसेवक कलवंतसिंग सोहता,स्वप्निल बागुल,संघटक सागर उटवाल आदिंनी कलानी विरोध थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात पोहोचवला आहे.

दरम्यान एकीकडे ज्योती कलानी यांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होताच,राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक सुधाकर वड्डे यांनी गटनेते आणि उल्हासनगर विधानसभे करिता इच्छुक भारत गंगोत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नव्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदी हरकीरन (सोनिया) कौर धामी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी गटनेते भारत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे, सुमन सचदेव, माजी नगरसेवक भीमसेन मोरे, सतीश चहाळ, मन्नू जागरा, माधव बगाडे उपस्थित होते. सोनिया कौर ह्या राजकारणात नवख्या आहेत. त्यांचे यापूर्वी कोणतेही राजकीय वलय नसल्याने पक्षाची धुरा किंबहुना जबाबदारी हाताळण्याचे मोठे आव्हान सोनिया कौर यांच्यापुढे उभे राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com