Justice Satyaranjan Dharmadhikari resigns  | Sarkarnama

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी शुक्रवारी (ता. 14) पदाचा राजीनामा दिला. व्यक्तिगत आणि कौटुंबिक कारणांमुळे महाराष्ट्राबाहेर बदली घेऊ शकत नाही. त्यामुळे राजीनामा दिला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे न्यायालयातच त्यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी शुक्रवारी (ता. 14) पदाचा राजीनामा दिला. व्यक्तिगत आणि कौटुंबिक कारणांमुळे महाराष्ट्राबाहेर बदली घेऊ शकत नाही. त्यामुळे राजीनामा दिला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे न्यायालयातच त्यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली.

मुंबई उच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती असलेले न्या. सत्यरंजन धर्माधिकारी (60) यांना अन्य एका राज्याचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय झाला आहे; परंतु मुंबई सोडण्याची आपली इच्छा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावर नियुक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्णत: वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांवरून राजीनामा दिला, असे त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर ऍड्‌. मॅथ्यू नेदुमपारा यांनी एका प्रकरणाचा उल्लेख खंडपीठापुढे केला. त्यावेळी न्या. धर्माधिकारी यांनी सांगितले, की आज माझ्या कामकाजाचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे नवे प्रकरण दाखल करू नका. न्या. धर्माधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे वकील वर्गातही खळबळ उडाली. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. 

न्यायालयावर सर्व काही सोपवणे अयोग्य
लोक आणि लोकप्रतिनिधी जबाबदाऱ्या विसरू लागले आहेत. जनतेने प्रश्‍न करायला हवेत, पण सर्व जण आता न्यायालयावरच सर्व काही सोपवत आहेत; हे योग्य नाही, असेही न्या. सत्यरंजन धर्माधिकारी म्हणाले. राजीनाम्यानंतर आता कुटुंबीयांसाठी आणि स्वतःसाठी वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेखन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या दीडशे वर्षांच्या परंपरेचा सन्मान यापुढेही जपला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांचे वडील आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

परखड, व्यासंगी व्यक्तिमत्त्व
बी. कॉम. व एल.एल.बी. झाल्यानंतर सत्यरंजन धर्माधिकारी यांनी 28 जून 1983 रोजी वकिलीला सुरुवात केली. उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नोव्हेंबर 2003 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. परखड मत, व्यासंग आणि मुद्देसूद मांडणी ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये सांगितली जातात. आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेड, पर्यावरण, शिक्षण, दाभोलकर-पानसरे हत्याकांड, निवडणूक याचिका, महिला विकास, सुरक्षा, मुंबई जिल्हा बॅंक, पीएमसी बॅंक अशा अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांत त्यांनी परखडपणे न्यायदान केले आहे. न्यायालयीन कामकाजाशी संबंधित अनेक समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अनेक महत्त्वाच्या जनहित याचिकांची सुनावणी त्यांच्या खंडपीठापुढे सुरू होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख