Congress Leader Nana Patole with MahaVikas Aghadi Leaders
Congress Leader Nana Patole with MahaVikas Aghadi Leaders

जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष : नाना पटोलेंचा प्रवास 

साकोली तालुक्‍यातील सुकळी येथे फाल्गूनराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा जन्म 5 जून 1963 मध्ये झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते नानाभाऊ म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. विद्यार्थी संघटनेत काम करीत असताना 1990 मध्ये सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढविली. यात ते विजयी झाले. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार, खासदार आदी पदेही भूषविली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करीत खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले. यानंतर नागपूर लोकसभा मतदार संघात त्यांनी भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली. यात ते पराभूत झाले असले तरी त्यांनी चांगलीच चुरस निर्माण केली होती. नंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आमदार झाले. अशा या लढवय्या नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी झाल्याने भंडरा जिल्ह्यासह विदर्भात आनंद आहे. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंकडून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीच नाना पटोलेंचे नाव विधानसभच्या अध्यक्षपदासाठी जाहीर केले. 

साकोली तालुक्‍यातील सुकळी येथे फाल्गूनराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा जन्म 5 जून 1963 मध्ये झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते नानाभाऊ म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. विद्यार्थी संघटनेत काम करीत असताना 1990 मध्ये सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढविली. यात ते विजयी झाले. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 

1999 व 2004 मध्ये कॉंग्रेसने लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. यात त्यांनी विजय मिळविला. मात्र, आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दावर तत्कालीन कॉंग्रेस पक्ष गंभीर नसल्याचे कारण समोर करून 2008 मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दरम्यानच्या काळात ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून 2009 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढविली. त्यात त्याचा पराभव झाला. 

जुलै 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपकडून विजयी झाले. 

2014 मध्ये त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी सुमारे दीड लाख मताधिक्‍याने पराभव केला. आठ डिसेंबर 2017 ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर नाराज होत जाहीर टीका करीत शेतकरी व इतर मागासवर्गाच्या प्रश्‍नांवर लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कॉंग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 

एकदा खासदार तर चारवेळा आमदार 

2019च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूरमधून भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविली. यात ते पराभूत झाले, मात्र त्यांनी चांगलीच चुरस निर्माण केली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत साकोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा पराभव करून त्यांनी विजय खेचून आणला. 

विशेष म्हणजे त्यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी साकोलीत सभा घेतली होती. त्यामुळे त्यांच्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. एक वेळा खासदार राहिलेले नाना पटोले हे यावेळी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

आक्रमक नेता म्हणून ओळख 

ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ते नेहमीच आंदोलन करीत आले आहेत. यामुळे आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com