उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे, महाराष्ट्र भाजपमुक्त करावा : जोगेंद्र कवाडे

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे, महाराष्ट्र भाजपमुक्त करावा : जोगेंद्र कवाडे

औरंगाबाद : उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याला कुणाचाही विरोध नाही, कॉंग्रेसनेही त्याला विरोध केलेला नाही. कारण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी तो आता महाराष्ट्रवादी झाला आहे. तेव्हा उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि राज्याला भाजपमुक्त करावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. राज्यातील बदलती सत्ता समीकरणे आणि त्यातून नव्याने आकारास येणारी महाशिवआघाडी या पार्श्‍वभूमीवर खाजगी कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका मांडली. कवाडे म्हणाले, केंद्रातील भाजपच्या भस्मासुराला टक्कर देणे हे मोठे धाडसाचे काम आहे, शिवसेनेने हे धाडस दाखवले आहे. आता शिवसेनेने जशी मुक्ती मिळवली, तशी महाराष्ट्राला देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपपासून मुक्ती मिळवून द्यावी. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत लवकर आणि स्थिर सरकार बनवावे. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी हरकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरीही अडचण नाही. कॉंग्रेसनेही याबाबत अशी कोणतीही अट ठेवली नसल्याचा दावाही कवाडे यांनी यावेळी केला. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेसने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याने अनेकांनी आता तुम्ही हिंदुत्ववादी पक्षांसोबत जाणार का? असा सूर आळवायला सुरूवात केली आहे. 

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी आता तो महाराष्ट्रवादी झाला आहे, आणि वैचारिक परिवर्तनातून सत्ता मिळवता येते. त्यामुळेच शिवसेनेसोबत राज्याला पाच वर्ष स्थिर सरकार देता येईल असा विश्‍वास व्यक्त करतांनाच आम्हालाही सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा अशी अपेक्षा कवाडे यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com