जेएनयू : गुंडाकडून विशिष्ठ लोकच लक्ष्य झाल्याचा आरोप, दोन्ही बाजुंनी उडाली आरोप प्रत्यारोपांची राळ

जेएनयू : गुंडाकडून विशिष्ठ लोकच लक्ष्य झाल्याचा आरोप, दोन्ही बाजुंनी उडाली आरोप प्रत्यारोपांची राळ

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) काल (रविवारी) रात्री गुंडांच्या टोळक्‍याने घातलेल्या धुडगुस प्रकरणानंतर हे विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मात्र यावरून डाव्या विद्यार्थी संघटना व सत्तारूढ संघपरिवारातील अभाविप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार रूमालांनी चेहरा झाकलेल्या या सशस्त्र गुंडांनी डाव्या व आंबेडकरवादी, दलित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या वाहनांना वेचून वेचून लक्ष्य बनविले. प्रशासनाचा छुपा पाठिंबा असलेल्या गुंडांनी केलेले हे सिलेक्‍टिव्ह " लिंचिंग' असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. सायंकाळी सात ते 9 या काळात हा नियोजित हिंसाचार सुरू असताना पोलिस कोठे होते ? प्रसासनाकडून आश्‍वासक भूमिकाच घेतली जात नाही त्यामुळे जेएनयूमध्ये प्रचंड तणावपूर्ण शांतता आहे. 2015 नंतर जेएनयूमध्ये हिंसाचार करून विद्यापीठाला बदनाम करण्याचे पध्दतशीर प्रयत्न प्रस्थापितांकडून सुरू झाल्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांचे म्हणणे आहे. 

एखाद्या हॉटेलात असतात तसे "बॉक्‍सर' असलेल्या या गुंडांच्या मारहाणीत 40 विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यानंतर 30 तास उलटले तरी विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार अदृश्‍य आहेत व येथे प्रशासनाचे "पत्रक-राज़' सुरू आहे असा प्राध्यापकांचा साधार आरोप आहे. देशाचे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक दिल्लीतूनच गायब असून त्यांनी आज दुपारनंतर भुवनेश्‍वरमधून पहिली प्रतीक्रिया देताना, शिक्षण संस्थांना राजकारणाचा अड्डा बनवू देणार नाही असे ट्‌विट केले. मात्र जेएनयूमध्ये घुसलेले गुंड कोणाच्या आशिर्वादाने आले होते हे निशंक यांना त्यांच्या "बॉस'ने सांगितले नाही का, असा संतप्त आणि जीवावरच बेतलेल्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा सवाल आहे. 

जेएनयूमध्ये शैक्षणिक फी वाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. किंबहुना या शैक्षणिक आंदोलनाची सुरवातच जेएनयूमध्ये झाली. गेले तीन दिवस 
नवीन सत्राच्या रजिस्ट्रेशनवरून हा मुख्य वाद उफाळला आहे असे प्रा. मिलिंद आव्हाड यांनी सांगितले. विद्यापीठ परिसरात आधी शांतता आणा व नंतर नव्याने रजिस्ट्रेशन करा अशी मुख्य मागणी आहे. मात्र व्यवस्थापनाने त्याबाबत घाईघाई सुरू केली असेही ते म्हणाले. विद्यार्थी व नंतर प्राध्यापक म्हणून जेएनयूशी गेली 17 वर्षे संबंध असलेले प्रा. आव्हाड यांच्या मते जेएनयूला बदनाम करणे व देशाच्या शिक्षण क्षेत्रात दहशत निर्माण करणे हाच यामागील उद्देश असल्याचेही ते म्हणाले. हे प्रशासनाचा पाठिंबा असलेलेच गुंड होते व ते अभाविपशी संबंधित असावेत कारण दलित, आंबेडकरवादी व डाव्या विद्यार्थ्यांनाच त्यांनी लक्ष्य बनविले. त्यातून काल आंदोलन झाले व ते हिंसक बनले. काल (ता. 5 ) सायंकाळी साबरमती धाब्यावरील बैठक संपली. त्याचवेळी काठ्या, रॉड घेऊन 50 तरूणांची झुंड शिरली. 

शिक्षकांना शोधून शोधून त्यांच्या गाड्या फोडल्या. त्यांनी आंबेडकरवादी व डाव्या विद्यार्थी-प्राध्यापकांना टार्गेट केले, दलित आदिवासी प्राध्यापकांना मारहाण केली गेली. पोलिसांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. जामियात परवानगी नसताना घुसणारे पोलिस जेएनयूमध्ये काल तीन चार तास गुंडांचा हैदोस सुरू असताना रात्री नऊनंतर आवारात आले. "भक्कम पाठिंबा' लाभलेल्या गुंडांना वेळीच आवरण्यात अपयश आलेल्या दिल्ली पोलिसांचीही भूमिका अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. अभाविप व डाव्या संघटनांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. अभाविपने डाव्या संघटनांना याबद्दल जबाबदार ठरविले आहे व कोयना वसतीगृहातील विद्यार्थिनींनाही या गुंडांनी नको त्या ठिकाणी मारहाण केल्याचा त्यांचा आरोप आहे. काल शांतता मार्चच्या निमित्ताने बाहेरचे 700 लोक एकत्र झाले होते व त्यांच्यातील काहींनीच ही मारहाण केली असेही अभाविपने म्हटले आहे. 

विद्यापीठाचे प्रशासन व दिल्ली पोलिसांची या प्रकारातील भूमिका अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. नव्या सत्राच्या रजिस्ट्रेशनबद्दल प्रशासनाने सक्तीवजा आग्रह धरला आहे.ही घाई करू नका, असा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. त्यापूर्वीपासून फीवाढीच्याही विरोधात आंदोलनाने नंतर पेट घेतला. त्यानंतर अभाविप व सरकारच्या गोटातून आंदोलकांना देशद्रोही, राष्ट्रद्रोही म्हटले जाऊ लागले. 2016 नंतर जेएनयूतील तणाव वाढत गेला. स्मृती इराणी यांच्या काळात तो प्रचंड वाढला. त्याची परिणिती काल विद्यापीठात लाठ्या काठ्या घेऊन घुसलेल्या गुंडांनी हैदोस घालण्यात झाली. कालच्या हैदोसाच्या आधी, "राष्ट्रद्रोह्यांना संपवा' , "व्हीसी हमारा है,' असे व्हॉटसऍप संदेश फिरत होते त्याकडे पोलिस व त्यांच्या नाड्या असलेल्या गृहमंत्रालयाने डोळेझाक केली व विद्यापीठात अमानुष मारहाण सुरू असताना न येणारे पोलिस आज काय टाळ्या पिटायला आले का, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. 

दहशतीच्या सावटाखाली अनेक विद्यार्थ्यांनी जेएनयू आवार सोडून जाण्यास सुरवात झाली आहे. जेएनयूतील प्रागतिक विचारांच्या विद्यार्थी-प्राध्यापकांवरील या हल्ल्याचे पडसाद एएमयू, एफटीआयआय, मुंबई, हैदराबाद विद्यापीठांपासून इंग्लंडच्या ऑक्‍सफर्ड विद्यापीठापर्यंत उमटले आहेत. 

विद्यापीठ राजकारणाचा अड्डा नको 
विद्यापीठे ही शिक्षण घेण्यासाठी बनविलेली असतात. कालच्या प्रकारातील दोषींना निश्‍चित शिक्षा होईल. मात्र विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा बनवू दिला जाणार नाही. असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल, निशंक यांनी या हल्ल्यानंतर स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com