Jitendra Awhad targets government on Bramhin Issue | Sarkarnama

ब्राम्हणांच्या एकाच मोर्चात सरकारने पावलं उचलली, हे सरकार जातीयवादी : जितेंद्र आव्हाड 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 23 जानेवारी 2019

धनंजय कुलकर्णी यांच्याकडे 170 शस्त्रे सापडली. कुलकर्णी ऐवजी कांबळे असता तर तो नक्षलवादी ठरला असता. त्याने वाचलेल्या पुस्तकाचे लेखक सुद्धा जेलमध्ये गेले असते.

-जितेंद्र आव्हाड

औरंगाबादः मराठा समाजाने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी 58 मुक मोर्चे काढले. तरीही दखल न घेतल्याने अनेकांना बलीदान द्यावे लागले. मात्र, ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यांसाठी एकच मोर्चा काढला आणि लगेच सरकारने पावले उचलली, असा टोला लगावतांनाच हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

 औरंगाबादेत बुधवारी (ता. 23) 'सोच से सोच की लढाई' या कार्यक्रमाचे आयोजन युथ फॉर डेमोक्रॅसी आणि व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. 

यावेळी बोलतांना जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत ब्राम्हण समाजाच्या वतीने मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत सरकारवर टिका केली. मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यात 58 मोर्चे काढावे लागले तरी सरकार जागचे हलले नाही. मुक मोर्चाचे रुपांतर नंतर ठोक मोर्चात झाले, मराठा तरूणांनी बलिदान दिले तेव्हा कुठे सरकारने निर्णय घेतला. 

मात्र ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यासाठी आझाद मैदानावर एकदाच निदर्शने केली तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या एका झटक्‍यात मान्य केला. यावरून राज्यात सरकार कुणाचे आहे? हे लक्षात येते. भाजप सरकार जातीयवादी असल्याचा आरोप आव्हाड यांनी तरुणांशी संवाद साधतांना केला. 

श्री. आव्हाड पुढे म्हणाले,"धनंजय कुलकर्णी यांच्याकडे 170 शस्त्रे सापडली. कुलकर्णी ऐवजी कांबळे असता तर तो नक्षलवादी ठरला असता. त्याने वाचलेल्या पुस्तकाचे लेखक सुद्धा जेलमध्ये गेले असते. तोच जर कुरेशी असता तर त्याला दहशतवादी ठरवून चौकशीसाठी तो राहत असलेला अख्या मोहल्ल्यालाच अटक झाली असती".

श्री. आव्हाड  म्हणाले," सरकारला कुलकर्णी यांच्याकडील शस्त्रसाठा सापडणे गंभीर वाटत नसेल तर आम्हाला देखील शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी खळबळजनक मागणी देखील आव्हाड यांनी यावेळी केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख