यहां पत्थर भी बोलता है...!

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बाजारीकरणाला माझा विरोध अनाठायी आहे, आक्रस्ताळी आहे, असा आरोप सध्या माझ्यावर केला जातो आहे. इतिहासाच्या बाजारीकरणाला, संस्कृतीच्या बाजारीकरणाला विरोध हा त्यांच्या मते आक्रस्ताळेपणा ठरत असेल, तर ठरू दे....
Forts and Jitendra Awhad
Forts and Jitendra Awhad

हाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बाजारीकरणाला माझा विरोध अनाठायी आहे, आक्रस्ताळी आहे, असा आरोप सध्या माझ्यावर केला जातो आहे. इतिहासाच्या बाजारीकरणाला, संस्कृतीच्या बाजारीकरणाला विरोध हा त्यांच्या मते आक्रस्ताळेपणा ठरत असेल, तर ठरू दे. ज्यांना या महाराष्ट्रातल्या शिवपरंरेचा अभिमान नाही, उलट मनातून दुस्वासच आहे, तेच असा आरोप करू शकतात. मुळात यांना इतिहासच माहीत नाही, असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. 

नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात असलेल्या साल्हेरच्या किल्ल्याचं उदाहरण घेऊ. समुद्रसपाटीपासून ५४४१ फूट उंचीवर असलेला हा किल्ला कळसुबाई नंतर सह्याद्री पर्वताचं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. इतक्या उंच ठिकाणी  किल्ला बांधणं हीच वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एक अफाट गोष्ट आहे. 

आग्र्याहून सुटका करून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुन्हा स्वराज्यात परतले आणि त्यांनी स्वराज्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली तेव्हा लष्करी दृष्टीने मोक्याचा किल्ला म्हणून त्यांनी साल्हेरवर आपला कब्जा केला. मुघलांच्या अंमलाखाली असलेला बागलाण प्रांत आपल्या अमलाखाली आणण्यासाठी साल्हेरचा किल्ला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. आजच्या गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला हा किल्ला महाराजांनी सुरतेवर स्वारी करून परत येताना एक महत्त्वाचा मुक्काम म्हणून, एक लष्करी तळ म्हणून वापरला होता. 

सुरतेवरच्या स्वारीनंतर हैराण झालेल्या औरंगजेबाने तेव्हा इखलासखान आणि बहलोलखान या आपल्या दोन सरदारांना साल्हेरचा किल्ला मराठ्यांच्या तावडीतून परत मिळवण्याचा आदेश दिला. आणि त्यानंतर झाली ती मुघल विरुद्ध मराठ्यांच्यातली प्रसिद्ध साल्हेरची लढाई. जी मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ करून जिंकली. सभासद बखरीनुसार या लढाईत दोन्ही बाजूंनी लाखो सैनिक उतरले होते. हत्ती, उंट, घोडदळ, तोफांचा तुफान मारा यात दोन्ही बाजूचे मिळून किमान वीस हजार सैनिक मारले गेले. युद्धभूमीवर रक्ताचा सडा पडला. 

पण महाराजांनी व्यवस्थित योजना आखली होती. कोकणातून त्यांच्या आदेशानुसार लढाईसाठी वर आलेले मोरोपंत आणि औरंगाबादहून आपली फौज घेऊन धावलेले प्रतापराव सरनौबत, या मराठ्यांच्या सेनापतींनी मुघल सेनेला अखेर पाणी पाजलं. जीव घेऊन पळालेल्या इखलासखान आणि बहलोलखानाच्या सैन्याचे जवळजवळ हजारभर उंट आणि घोडे, दीडशे हत्ती आणि दाग-दागिने मराठ्यांच्या ताब्यात आले. 

मुघलांच्या या पराभवाने मराठ्यांचा दरारा सबंध भारतात पसरला याचं कारण सांगताना सभासदकार म्हणतात की, पहिल्या प्रथमच आपला नेहमीचा गनिमी कावा न वापरता मराठ्यांनी साल्हेरच्या पायथ्याशी उघड्या मैदानात मुघलांना अंगावर घेतलं होतं. लष्करीदृष्ट्या अशा लढाईत मुघल मराठ्यांपेक्षा नक्कीच सरस होते. तसा फाजील आत्मविश्वास सुद्धा त्यांना होता. पण तरीही जिगरबाज मावळ्यांनी ही लढाई जिंकून मुघलांची मक्तेदारी संपुष्टात आणली. 

छत्रपती शिवाजी महाराजांना आता कमी लेखता कामा नये आणि आणि स्वतःच दख्खनमध्ये उतरून दिवसेंदिवस वाढत असलेलं मराठा साम्राज्य संपवलं पाहिजे, असा जो निर्णय पुढे औरंगजेबाने घेतला, त्याला साल्हेरच्या लढाईतला मुघलांचा पराभव हे एक महत्त्वाचं कारण होतं. पुढचा इतिहास आता इथे सांगायची गरज नाही. 

साल्हेरच्या लढाईत सूर्याजी काकडे हा महाराजांचा एक अत्यंत जवळचा सहकारी तोफेच्या गोळ्याने मारला गेला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाशी भेट घेताना जे काही निकटचे मराठा सरदार खानाच्या फौजेवर तुटून पडायला तयार होते, त्यापैकी सूर्याजी काकडे हा एक होता. प्रत्येक शिवभक्ताच्या रक्तातला अंगार जागवणारा हा किल्ला महाराष्ट्र सरकारने आता पर्यटनाच्या नावाखाली बाजारात विकायला काढला आहे. 

साल्हेरचा किल्ला हे एकच उदाहरण मी दिलं.अजून अश्या आठ किल्ल्यांची नाव त्यांनी दिली आहेत. उदाहरणार्थ लोणावळ्याचा कोरीगड किल्ला. तो ही शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. कोकण आणि घाट यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा होता. आज जळगाव जिल्ह्यात असलेला पारोळा किल्ला, जिथे १८५७ च्या पहिल्या ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या झालेल्या बंडातील भारतीय सेनानी राणी लक्ष्मीबाई हिचा जन्म झाला. हे तीनही किल्ले महाराष्ट्र सरकारने त्यांच्या तथाकथित पर्यटन योजनेमध्ये समाविष्ट केले आहेत.

त्याच योजनेतील कंधारचा किल्ला हा 1200 वर्षांपूर्वीचा आहे. राष्ट्रकूट घराण्यानी हा किल्ला बांधला होता तर घोडबंदरचा किल्ला जो पोर्तुगीजांनी बांधला. 1530 मध्ये शिवाजी महाराजांनी त्या नंतर त्यावर आक्रमण केले. पण चिमाजीअप्पा ह्यांनी तो जिंकला. नगरधन किल्ल्याचा इतिहास हा राष्ट्रकूट घराण्याशी जोडला जातो. पण तो भुईकोट किल्ला बांधला 1740 मध्ये राघोजी भोसलेंनी राष्ट्रकूट आणि वाकाटकाचा इतिहास हा दुर्लक्षित करून कस चालेल?

त्याच्याशी बौद्ध आणि जैनांचा इतिहास जोडला आहे. प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही, असं म्हणणारं सरकार इतिहासाशी बेइमानी कसं करू शकतं? महाराष्ट्राचा इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत थांबत नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे असंख्य लोक आहेत. त्यात मुघलांना चोपून काढणारे संताजी-धनाजी आहेत. आणि अटकेपार झेंडे फडकवणारे सरदारही आहेत. इतिहासाची वर्गवारी करता येत नाही. प्रत्येक पडक्या किल्ल्यातल्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे. तो दगड एका परवाचा साक्षीदार आहे. एक परंपरा आहे. ती जतन करायच्या ऐवजी सरकार त्याचा धंदा मांडत आहे. 

माझा एक जवळचा मित्र नुकताच ग्रीसला जाऊन आला. राजधानी असलेल्या अथेन्स या शहरात एकही गगनचुंबी इमारत नाही असं तो म्हणाला. कारण काय तर जवळच्या उंच डोंगरावर असलेलं अडीच हजार वर्षांपूर्वीच ग्रीक संस्कृतीचं एक प्रतीक अॅक्रोपोलीस हे शहरात फिरताना कुठूनही दिसावं म्हणून. अनेक लढायांमध्ये, भूकंपांमध्ये बऱ्यापैकी कोसळलेली ही प्राचीन वास्तू त्यांनी प्राणपणाने जतन केली आहे. रोम शहरातल्या प्राचीन कलोझियमची सुद्धा तीच गोष्ट. पण तरीही हे भग्नावशेष पहायला जगभरातून कोट्यावधी पर्यटक तिथे दरवर्षी जातात. सरकारला करोडो अब्ज डॉलरचं उत्पन्न मिळतं. कलोझियम किंवा ॲक्रोपॉलिस मध्ये लग्नाच्या पार्ट्या आणि दारूच्या मैफिली करून ग्रीक किंवा इटालियन सरकार पैसे कमवत नाही. आपली प्रेरणादायी संस्कृती जतन करून आणि ती जगाला दाखवून ते पैसे कमावतात. एकेकाळचे शूर ग्रीक योद्धे आणि रोमन सम्राट त्यांना प्रेरणा देतात. तुम्हाला छत्रपती आणि त्यांचे मावळे यांच्यापासून प्रेरणा घेता येत नाही हा दैवदुर्विलास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com